मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात येत असून त्यासाठी या यात्रेसाठीच्या मार्गावर आडव्या येणाऱ्या विजेच्या तारा, झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहेत. एकीकडे वृक्ष लागवड करण्यास सरकार प्रोत्साहन देत असताना दुरारीकडे झाडांची कत्तल होते आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. मात्र आम्हाला न जुमानता वनसंपदा जमीनदोस्त होत आहे असाही आरोप या पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

यात्रा मार्गावर विजेचे खांब १८ फुटांचे आहेत आणि यात्रेचा रथ हायड्रोलिक स्टेजसह २२ फुटांचा होतॊ. या रथाला अडथळा येतो म्हणून विजेच्या तारा तोडल्या जात आहेत. कासेगाव, पेठनाका, इस्लामपूर, तुपारी फाटा, पलूस, किर्लोस्करवाडी, येळावी, तासगाव, मिरज मिशन चौक, सांगली-मिरज रोड कर्मवीर चौक, सिव्हिल रोड, कोल्हापूर रोड अशा सर्वत्र तारा तोडल्या जात आहेत. यासाठी काही लाखाचा बोजा वीज मंडळावर पडणार आहे.

असाच प्रकार झाडांबाबतही होतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगली,इचलकरंजी,कोल्हापूर या भागात आहे
या यात्रेसाठी वापरवण्वयात आलेल्या रथाला अडथळा येऊ नये म्हणून या रस्त्यावरील अनेक झाडे छाटली गेली. तर काही झाडे मुळापासून काढून टाकण्यात आली आहेत. मुळापासून काढलेली झाडे दिसू नये म्हणून त्यावर दगड टाकून झाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात यावीत असे आवाहन करत असतात, पण त्यांच्याच दौऱ्यात झाडे जमीनदोस्त होत आहेत हे वास्तव आहे असं पर्यावरण प्रेमींनी म्हटलं आहे.

जयसिंगपूर येथे वाद
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूरजवळ असलेल्या उदगाव गावात सुमारे ७० ते ८० वर्षे जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. झाडे तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शीतलकुमार चौगुले, मन्सुर मुल्लाणी, कुबेर मगदूम यांच्यासह ग्रामस्थ जाब विचारत होते. मात्र या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात अनेक झाडे जमीनदोस्त केली. त्यामुळे उदगावमधून नाराजीचा सूर उमटत आहे.