परवानगीनंतरच झाडे तोडल्याचा संस्थेचा दावा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरील २० ते २५ झाडे तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पुणेकरांसह पर्यावरणवाद्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, विरोधकांनीही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महायुतीच्या पुण्यातील आठ उमेदवारांसह जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सभा होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून मैदानावर छत असलेला मंडप उभारण्यात येत आहे. हे काम सुरू असताना मैदानाच्या कडेने असलेली झाडे सोमवारी रात्री तोडण्यात आली.

काही झाडे पूर्णपणे तोडण्यात आली असून काहींचे केवळ बुंधे ठेवण्यात आले आहेत. काही झाडे निम्मी तोडण्यात आली आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर पर्यावरणवाद्यांसह विरोधकांनी भाजपवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेआधीही पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील काही झाडे तोडण्यात आली होती. त्याबाबत राजकीय पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवला होता.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल आणि संबंधितांवर  कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या संदर्भात नंतर कारवाई झाली नाही.

महाविद्यालयाच्या परिसरात सहा शाळा असून वीस हजार विद्यार्थी तेथे शिकत आहेत. मध्यंतरी मुसळधार पावसानंतर काही झाडे धोकादायक बनली. त्यामुळे ती छाटण्याची रीतसर परवानगी महापालिका आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे यापूर्वीच मागण्यात आली होती. उद्यान विभागाने परवानगी दिल्यानंतरच सुरक्षिततेच्या कारणास्तव झाडे छाटण्यात आली. त्याचा मोदींच्या सभेशी संबंध नाही. – अ‍ॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी

स. प. महाविद्यालयातील वृक्षतोडीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा संबंध नाही. शिक्षण प्रसारक मंडळीकडून झाडे छाटण्याची परवानगी आयुक्तांकडे मागण्यात आली होती. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या परिसरातील काही झाडे पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा अर्ज विश्वस्तांकडून करण्यात आला होता.

– माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप

फांद्या नव्हे, तर पूर्ण झाडेच तोडण्यात आलेली आहेत. शिक्षणसंस्था भाजपप्रणित असल्यामुळे असे प्रकार होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेच्या वेळीही झाडे तोडण्यात आली होती. या सर्व घटना निषेधार्ह आहेत.

-वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

आरेमधील वृक्षतोड असो, स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडे असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, सरकारचे धोरण दुटप्पी आहे. या प्रकाराचा निषेध करणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.

मोहन जोशी, माजी आमदार, काँग्रेस