स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर वृक्षतोड झाल्याची आपल्याला माहिती नाही, याबाबत माहिती घेऊन सांगते, अशा स्वरुपाचे उत्तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे. पुणे शहराचा कारभार आपल्या हातात असताना अशा गंभीर विषयावर उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहे. अशीच एक सभा पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर १७ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता होणार आहे. यासाठी शहर भाजपाकडून सभास्थळी जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र, सभेदरम्यान अडथळा ठरणाऱ्या १५ ते १६ झाडांची सोमवारी रात्री कत्तल करण्यात आली.

स. प. महाविद्यालयाचा परिसर हा कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. याच मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक या विधानसभेसाठी भाजपाच्या उमेदवार आहेत. दरम्यान, शहरात त्यांच्याच प्रचारसभेसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊनही आपल्याला याची माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी सुरुवातीला दिले.

मात्र, नंतर या वृक्षतोडीबाबत संबंधितांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने मैदान परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या होत्या त्यातच आता या मैदानावर सभा होणार आहे. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडून महापालिकेची परवानगी घेऊन, झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.”