औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या सभेत भाजप बंडखोरीची चर्चा केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले. येते काही दिवस अफवांचे आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. एकदा झालेली मतविभाजनाची चूक पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका. परिस्थिती बिघडविण्याचे काम काहीजण करत आहेत, असे उमेदवार संजय शिरसाट यांना सांगावे लागले. तोच सूर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उचलून धरला. बंडखोरी चालणार नाही असे मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे, असे ते म्हणाले. शहरातील शिवशंकर कॉलनीत पालकमंत्री शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या सुरुवातीला पालकमंत्री येण्यापूर्वी भाजपचे जालिंदर शेंडगे म्हणाले,की युती संदर्भात काही जण शंका उपस्थित करत आहेत. वाद उत्पन्न केले जात आहेत, पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेनेला मतदान करावे, असे आवाहन राजेंद्र जंजाळ यांनी केले. महापौर नंदकुमार घोडेले यांचेही या वेळी भाषण झाले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात जे कोणी गडबड करत आहेत, त्यांची यादी तयार केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हिंदुत्वासाठी शिवसेनेला मतदान करा, असे आवाहन केले. या मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे समर्थक राजू शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांनी प्रकाशित केलेल्या पत्रकांचा रंग  भाजपच्या उमेदवाराप्रमाणेच आहे. त्यावरील चिन्ह मात्र वेगळे आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या सभेत बंडखोरांची चर्चा केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले. ‘काही जणांना त्या गाण्यातलेसारखे आमदार झाल्यासारखे वाटते आहे. पण कुठे, कधी याचा जरा विचार करावा. एकदा झालेली चूक पुन्हा होऊ देऊ नका. कोणी जर अंगावर येत असेल तर शिंगावर घेऊ’ असे म्हणत संजय शिरसाट यांनी बंडखोर उमेदवार राजू शिंदे आणि एमआयएम पक्षावर टीका केली.

कचरा आणि पाणी प्रश्न सोडवताना बीड वळण रस्त्यासाठी अधिकचा निधी मिळविण्यात आमदार संजय शिरसाट यांना यश आल्याचा दावा या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या सभेस शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यासह राजू वैद्य, त्र्यंबक तुपे आदींची उपस्थिती होती.