प्रचार शेवटच्या टप्प्यात; पण तरीही अपेक्षित रंगत नाहीच प्रचार शेवटच्या टप्प्यात; पण तरीही अपेक्षित रंगत नाहीच

जागोजागी होणाऱ्या कोपरा सभा-मेळावे, नेत्यांच्या पदयात्रा, समाजमाध्यमातून होणारा आक्रमक प्रचार, नेत्यांचे रोड शो आणि वाहनफेऱ्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, ध्वनिवर्धक लावलेल्या वाहनातून होणारा उमेदवारांचा प्रचार असे निवडणुकीतील राजकीय वातावरण यंदा अपवादानेच शहरात दिसत आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाही राजकीय वातावरण केवळ पक्ष आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मोजक्या कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये आहे.

विधानसभेसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या प्रचारासाठीची मुदत शनिवारी  (१९ ऑक्टोबर) सायंकाळी पाचपर्यंत आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी निवडणुकीसाठी उमेदवार दिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला उमेदवारांकडून उत्साहाने सुरुवात झाली. मात्र लोकसभा निवडणुकीत दिसलेले उत्साही चित्र या निवडणुकीत अपवादानेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिसत आहे.

निवडणुका म्हटले की नेत्यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोप, बैठका, मेळावे, कोपरा सभा, प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचे खास रोड शो, पदयात्रा, दुचाकी रॅलीतून उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून मतदारसंघ ढवळून काढला जात असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होते. पारंपरिक प्रचाराला समाजमाध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रचाराचीही साथ मिळत होती. यंदा मात्र प्रचारातील पारंपरिक पद्धतही कमी झाल्याचे दिसत आहे. समाजमाध्यमातूनही काही ठराविक उमेदवारांचाच प्रचार होत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, नेत्यांचे पक्षांतर यामुळे प्रचारात रंगत येत नसल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा होत असल्या आणि काही सभा होणार असल्या तरी त्याबाबतही सामान्य मतदारांमध्ये आकर्षण नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड परिसरातही हेच चित्र आहे. निवडणुकीबाबत सामान्य नागरिकांमध्ये फारसा उत्साह दिसलेला नाही. चौकातल्या गप्पा किंवा कार्यालयीन वेळेत मिळालेल्या फुरसतीच्या वेळेतही निवडणुकीची फारशी चर्चा ऐकायला मिळत नसल्याने प्रचार शेवटच्या टप्प्यात येऊनही नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी उदासीनता दिसून येत आहे.

(पिंपरीतही उत्साह नाही)

ल्ल पिंपरी-चिंचवडमधील तीनही मतदारसंघांतील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्ष घरभेटीवर भर देऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवार ज्या भागात प्रचारासाठी जातो त्या भागात तेवढय़ाच काळात नागरिकांची तुरळक गर्दी पहायला मिळते. उमेदवाराची पाठ फिरल्यानंतर मतदार मतदानाविषयी फारशी चर्चा करत नसल्याचे चित्र आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शहरावर मंदीची छाया असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे तरुणांकडूनही निवडणुकीविषयी चर्चा होत नसल्याचे जाणवत आहे.

ल्ल  शासकीय कार्यालयामध्ये तसेच खासगी कार्यालयामध्ये मिळालेल्या फुरसतीच्या वेळेत गप्पांचा फड रंगला तरी त्यामध्ये निवडणुकीची फारशी चर्चा केली जात नाही. मतदारांमध्ये निवडणुकीविषयी उदानसीनता असल्याचे दिसत आहे. समाज माध्यमांवर उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. मात्र, रोज त्याच त्या पोस्ट पाहून मतदारही वैतागले आहेत. बहुतांश नागरिक निवडणुकीविषयी स्वत:हून चर्चा करत नाहीत वा हा विषय काढत नाहीत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चर्चेविना होत असल्याचे ज्येष्ठ मतदारांकडून सांगितले जात आहे.

२०१४ पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यांमध्ये प्रचाराचे आयाम मोठय़ा प्रमाणावर बदलले आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेणे, पत्रके वाटणे, रिक्षा आणि इतर वाहने फिरवून त्यांच्यामधून प्रचार करणे असे भारलेले वातावरण पूर्वी असे. आता हे संपले आहे, असे नाही, पण त्याचे प्रमाण लक्षात येण्याएवढे कमी झाले आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला भाषण ऐकायला जाणे हा देखील मतदारांच्या उत्साहाचा भाग होता, मात्र आता हातात असलेल्या मोबाईलवर कार्यालयात बसून भाषण ऐकायला मिळत असेल तर गर्दीत का जायचे असा विचार मतदार करतात. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयाची तर इतर राजकीय पक्ष पराभवाची खात्री असल्यामुळे प्रचारात फारसे उत्साही आहेत असे दिसत नाही. समाजमाध्यमे हे प्रचाराचे नव्याने गवसलेले तरी प्रभावी व्यासपीठ असल्यामुळे त्यावरून सक्रिय प्रचार करण्याला देखील अनेकांची पसंती आहे. त्यामुळे प्रचारातला जोष आणि जल्लोष हरवला आहे असे दिसते. – अनिकेत मुंदडा, परिवर्तन संस्था

निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची पूर्वी सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असायचा. यंदाची विधानसभा निवडणूक त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. आर्थिक मंदी, वाढती महागाई यामध्ये पिचलेले सामान्य नागरिक दररोज जगण्याची लढाई लढत असल्यामुळे त्यांना बहुधा निवडणुकीविषयीचे स्वारस्य नसावे असे वाटते. अर्थात वयोमानामुळे मी प्रचारामध्ये सहभागी झाले नाही. मात्र, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या बैठकांना उपस्थित राहते, पण तरीही मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव आहे, असे चित्र दिसून येते. – विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्त्यां

भाजपविरोधी पक्षांची पराभूत झालो आहोत, ही मानसिकता आणि जिंकणार हा भाजपचा अतिआत्मविश्वास यामुळे निवडणुकीत प्रचार होत नाही. दोन परस्पर विसंगत भूमिकांमुळे राजकीय भूमिकाही पुढे येत नाहीत. निवडणूक मुद्दय़ांवर किंवा प्रश्नांवर लढविली जात नाही. त्यातच समाजमाध्यमातूनही प्रचार होत असल्यामुळे निवडणुकीच्या वातावरणाची रंगत हरवत चालली आहे. – नितीन पवार, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते