|| वसंत मुंडे

वय वर्षे ८० पार केलेले माजी मंत्री शिवाजीराव पंडित व पंडितराव दौंड हे दोघेही सध्या तरुणही ओशाळतील इतक्या उत्साहाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. शिवाजीराव पंडित हे ‘दादा’ तर पंडितराव दौंड हे ‘बप्पा’ या नावाने ओळखले जातात.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारे काँग्रेसचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. तर गेवराई मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी मुलगा विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. दोन्ही माजी मंत्र्यांनी वय विसरुन जुन्या नव्या सहकाऱ्यांशी संवाद साधत असल्याने दोघांच्या उत्साहाने सर्वाचेच लक्ष केंद्रित केले आहे.

बीड जिल्ह्यत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवाजीराव पंडित आणि पंडितराव दौंड हे दोन माजी मंत्री यांचा प्रचारातील सहभाग पाहून तरुणही ओशाळत आहेत. ही दोन्ही नेते सध्या औत्सुक्याचा विषय ठरत आहेत. परळी मतदारसंघात मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेसचे नेते प्रा.टी.पी.मुंडे यांना भाजपात घेतल्यानंतर माजी मंत्री पंडितराव दौंड आणि संजय दौंड या पिता पुत्राने धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरतानाही पंडितराव दौंड हे मिरवणुकीत सहभागी झाले होते. दिवंगत रघुनाथराव मुंडे यांच्याबरोबर वकिली व्यवसाय करणारे पंडितराव दौंड यांना १९८५ ला काँग्रेस पक्षाने अचानक उमेदवारी दिली आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. परळी मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ‘बप्पा’ म्हणून परिचित असणारे पंडितराव दौंड हे जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते. अंबाजोगाई रुग्णालयात परळी मतदारसंघातून आलेल्या सर्वसामान्य माणसाला दौंड कुटुंबीयांचाच आधार राहिला आहे. दौंड यांची सून आशा दौंड या मागच्यावेळी जिल्हा परिषदेत उपाध्यक्षाही होत्या. ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संपर्क आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सतत कार्यरत असलेले पंडितराव दौंड यांनी वय विसरुन तरुणांना लाजवेल अशा उत्साहात प्रचारात सहभाग घेतला आहे. खेडोपाडी जाऊन त्यांनी जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधली आहे. सुरुवातीपासूनच स्पष्ट आणि तोंडावर बोलून मोकळे होणारा त्यांचा स्वभाव. यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची अनेकदा कोंडीही केली गेली होती. आपल्या परिसरातील माणसांना सतत मदत करण्यास ते सक्रिय असतात, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मतदारसंघात त्यांचे नातेवाईकही मोठय़ा प्रमाणावर आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच काळातील सहकारी असलेले गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनीही यावर्षी वयाची ८५ वष्रे पूर्ण केलेली असताना उत्साहाने मुलगा विजयसिंह पंडित यांच्या प्रचारात उतरले आहेत.

गेवराई तालुक्यावर चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सर्व संस्था ताब्यात ठेवून एकमुखी नेतृत्व करणारे शिवाजीराव ‘दादा’ या नावाने सर्वदूर परिचित आहेत. पक्षांतर्गत गटबाजीत दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव केल्याशिवाय टोपी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन पराभव करणारे शिवाजीराव हे एकमेव. करारी स्वभाव आणि स्पष्ट भूमिका यामुळे शिवाजीराव पंडित यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

अलीकडे चाळीस वर्ष पार करताच थकल्याचे सांगणाऱ्यांच्या काळात वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेले दोन्ही ज्येष्ठ नेते प्रचारात सकाळपासून सायंकाळपर्यंत सभांचा आणि भेटीगाठीचा धडाका करत असल्याने या निवडणुकीच्या मदानात हे ज्येष्ठ नेते औत्सुक्याचा विषय ठरले आहेत.