महायुतीच्या सरकारने सत्तेचा वापर शेतकरी, बेरोजगार, उद्योग यांच्यासाठी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य व अभिमानाचा इतिहास उद्ध्वस्त करण्यासाठी केला जात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राहुरीच्या राजकारणाला गुन्हेगारांचा कलंक लागल्याची टीका त्यांनी भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे याच्या राहुरी येथील प्रचार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे,अरुण कडू, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, कपिल पवार, सदस्य धनराज गाडे , गोविंद मोकाटे, निर्मला मालपाणी, सोमनाथ धूत, श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, एकेकाळी राज्याचे नेतृत्व कोण करणार हे राहुरीत ठरत होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक  यासह अनेक दिग्गज राहुरीत बैठक घेऊन धोरणे ठरवित होते. दिवंगत बाबुराव तनपुरे पुढाकार घेत असत. आज मात्र तालुक्याची ओळख गुन्हेगारीची झाली ही चिंता करणारी घटना आहे. राहुरी तालुका सधन होता. सध्या लोकप्रतिनिधीच गुन्हेगार होत चालल्याने अशा प्रवृत्तींना धडा शिकवा असे आवाहन केले.

युतीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले पण त्यांना एक वीट रचता आली नाही. पाच वर्षांत स्मारकाचे काम केले नाही. उलट गड व किल्ले हे हॉटेल सुरू करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या शौर्य व अभिमानाचा इतिहास पुसण्याचे काम त्यामुळे होणार आहे. अशी टीका त्यांनी केली.  यावेळी प्राजक्त तनपुरे,  गोविंद मोकाटे, निर्मला मालपाणी, सत्यवान पवार यांची भाषणे झाली.