आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण का दिलं गेलं नाही? राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत असा आरोप आता काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत असा आरोप केला. तसंच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही राज्यपालांवर अशाच प्रकारचा आरोप केला. एवढंच नाही तर राज्यपाल हे भाजपाच्या हातातले बाहुले आहेत का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही सत्ता स्थापन करु शकू किंवा करु शकणार नाही काहीही असलं तरीही आम्हाला संधी का दिली जात नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. तसंच अशोक चव्हाण यांनीही या संदर्भात टीका केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सत्तास्थापनेचा घोळ सुरु आहे या घोळातून कोणताही पर्याय समोर येताना दिसत नाहीये. सुरुवातीला भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात आलं. मात्र पुरेसं संख्याबळ नसल्याने आणि शिवसेना सोबत येऊ इच्छित नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही असं भाजपाने म्हटलं. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं आणि दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना २४ तासांची मुदत दिली. मात्र शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बोलवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसलाही आज रात्री ८.३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा दावा सिद्ध करण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला का बोलवण्यात आलं नाही असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण आणि सचिन सावंत यांनी विचारला आहे. दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी मुदतवाढ न दिल्याने शिवसेनेने  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही पुढच्या दोन दिवसात आम्ही यासंदर्भातला निर्णय घेऊ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.