सावंतवाडी : होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर लढणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून द्यायचे असेल तर कमळावर बटण दाबून मोठय़ा मताधिक्याने निवडून द्या. स्थानिक उमेदवार म्हणून ही निवडणूक न लढता विकासासाठी लढणारा, विकास करणारा उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना मत द्या. मोदींचे स्वप्न २२० पार करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करा. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात तावडे बोलत होते. या वेळी मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजश्री धुमाळे, प्रणिता पाताडे, अरिवद रावराणे, जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा दीपा गजोबार, आदी पदाधिकारी कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना तावडे म्हणाले, मोदींनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम हटवले आहे. त्यांनी शंभर दिवसांत वेगवेगळ्या योजना आणल्या. भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून येतील. असा विश्वास व्यक्त करीत मोदींना निवडून द्यायचे असेल तर कमळावर बटण दाबा असे आवाहन केले.

मतदानाला फक्त नऊ दिवस राहिले आहेत. यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुथवर दोन वेळा जाऊन आढावा घेणे महत्त्वाचे आहे. तसेच तळागाळात जाऊन मतदारांना भाजपची ध्येय, धोरणे पटवून द्या. तसेच प्रत्येक मतदार मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याची सर्वानी प्रयत्न करायचा आहे. असे त्यांनी या वेळी सांगितले.

पुढे बोलताना माजी आ. गोगटे यांनी शिवसेनेचे नाव न घेता सिंधुदुर्गात महायुतीचा धर्म आम्ही पाळला आहे.

मात्र शिवसेनेने युती धर्म न पाळता नितेश राणेंच्या विरोधात स्वाभिमानमधून शिवसेनेत प्रवेश केलेले सतीश सावंत यांना निवडणूक िरगणात उभे केले आहे. त्यांना आपली जागा दाखवून देऊ, असा टोला त्यांनी लगावला.