सीसीएच नावाच्या बनावट अमेरिकन ॲपसह मॕक्सो क्रिप्टो अॕपच्या माध्यमातून सोलापुरात हजारो गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आता बिशीच्या नावाखाली सामान्य कष्टकरी व मध्यमवर्गीयांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील बापलेक आणि सुनेविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- “…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी
बिशीच्या नावाखाली २७२ व्यक्तींना फसविण्यात आले असून फसवणुकीची रक्कम एक कोटी ७९ लाख ८४ हजार १०० रूपये इतकी आहे. याप्रकरणी बिशीचालक अशोक रामय्या कैरमकोंडा, त्याचा मुलगा अरविंद अशोक कैरमकोंडा आणि सून सुजाता अरविंद कैरमकोंडा (रा. २१२, नारायणराव कुचन कन्या शाळेजवळ, साखर पेठ, सोलापूर) यांच्या विरोधात महादेव चंद्रकांत तुम्मा (वय ६७, रा. नीलकंठेश्वर मंदिराजवळ, साखर पेठ, सोलापूर) या वृध्द गुंतवणूकदाराने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार फसवणुकीच्या आरोपासह चिटफंड ॲक्ट आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार शहराच्या पूर्व भागात कैरमकोंडा कुटुंबीयांनी २०१९ साली बेकायदेशीरपणे बिशी योजना सुरू केली होती. त्यात आकर्षक परतावा देण्याचे आमीष दाखवून शेकडो व्यक्तींना जाळ्यात ओढले होते. यात २७२ व्यक्ती सभासद झाल्या होत्या. बिशी सभासदांनी भरलेल्या मुद्दल रकमेवर दरमहा एक टक्का परतावा देण्याचे आमीष दाखवून बिशी योजना चालविली जात होती. प्रत्येक आठवड्यात सभासदांकडून ठेवीच्या रकमा गोळा केल्या जात असत. काही महिने परतावा मिळाला. त्यामुळे सभासदांचा विश्वास वाढला आणि सभासदांची संख्याही वाढत गेली. परंतु पुढे परतावा मिळणे बंद झाले आणि बिशीचालक कैरमकोंडा कुटुंबीयांकडून बिशी ठेवीवरील परतावा अदा करण्यास टाळाटाळ होऊ लागली. तेव्हा यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या सभासदांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून फसवणूक झालेल्या सभासदांचे जबाब नोंदविले आणि आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट हे पुढील तपास करीत आहेत. आरोपींना अटक झाली नाही. त्यांचा शोध घेतला जात आहे.