प्रदीप नणंदकर, लातूर

शिक्षणाची ‘फॅक्टरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात शिकवणी वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. करोनापूर्वीच वार्षिक एक कोटीपेक्षा अधिक पगार घेणारे ७० पेक्षा जास्त शिक्षक होते. आता ही संख्या वाढली असून एक कोटीपेक्षा अधिक पगार घेणारे १०० शिक्षक आहेत व त्यापैकी दोन कोटी पगार घेणारे २५ शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे छोटय़ा शिकवणीचालकांना या परिसरात नवी जागा मिळविणेही आता अवघड झाले आहे.

चार वर्षांपूर्वी लातुरातील शिकवणी वर्गाची वार्षिक उलाढाल बाराशे कोटीच्या आसपास होती, ती आता पंधराशे कोटींचा टप्पा ओलांडते आहे. यात शिकवणी चालकाचे शुल्क, वसतिगृहाचे शुल्क,अभ्यासिका व भोजनालयाचे शुल्क असे गृहीत धरले आहे. पुस्तके, वह्या अन्य शैक्षणिक साहित्य व शिकवणी वर्गाच्या बाहेरील उलाढाल गृहीत धरली तर हा आकडा आणखीन वाढेल. काही दिवसापूर्वी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अशी बिरुदावली आता थोडीशी मागे पडून कोटा येथील शिक्षक अशी बिरुदावली जाहिरातीमध्येही दिसू लागली.

सध्या लातूरच्या शिकवणी वर्ग भागात अनेकांनी पूर्वीच जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. जागेचा वापर शिकवणी वर्गाला भाडय़ाने देण्यासाठी किंवा वसतिगृहासाठी किंवा भोजनालयासाठी केला जातो. नव्याने येणाऱ्या शिकवणी वर्गाला जागाच मिळू दिली जात नाही, त्यासाठी चढय़ा भावाने पैसे द्यायला तेथील जे शिकवणी वर्ग सुरू आहेत ते तयार असतात. त्याचे परिणाम विद्यार्थी खर्चावरही होत आहे. किमान गरजा गृहीत धरुन एका विद्यार्थ्यांमागे दोन लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे लातूरचे अर्थकारण दिवसेंदिवस नवी उंची गाठत आहे.

काही वर्षांपूर्वी बाहेरून येणारे प्राध्यापक लातूरच्या शाहू महाविद्यालयात एक-दोन वर्ष नोकरी करत आणि पुढे ते शिकवणी वर्गात काम करत. तेथे शाहू महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक असे बिरुद लावत असत. आता स्पर्धा वाढली असल्याने आता राजस्थानातील ‘कोटा’ येथील माजी प्राध्यापक असे बिरुद अशी जाहिरात केली जात आहे.

दहावीच्या वर्गातील गुणवत्तेसाठी काही शाळांनी मेहनत घेऊन ‘लातूर पॅटर्न’ निर्माण केला. त्यानंतर अकरावी, बारावी परीक्षेत चांगले यश मिळवणारी दोन महाविद्यालये पुढे आली. महर्षि शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्रवेश ९८ ते ९९ टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहेत. या महाविद्यालयापेक्षाही आता खासगी शिकवणी वर्गाकडे विद्यार्थ्यांची संख्या अधिक वळत असून त्यासाठी कितीही शुल्क द्यायला पालक तयार आहेत. त्यातूनच शिक्षकांचे पगार कोटय़वधीच्या घरात गेले आहेत.

शिकवणी वर्गाची ही जीवघेणी स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याने त्यातूनच अविनाश चव्हाण या शिकवणी चालकाचा खून झाला होता. प्रत्येक शिकवणी वर्ग चालकाबरोबर लातुरातील विविध राजकीय पक्षातील मंडळींची छुपी भागीदारी आहे, हेही सर्वज्ञात आहे. शिकवणी चालकांना शिकवण्यात रस असतो, ते अन्य बाबींकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यासाठीच राजकीय मंडळींचा वरदहस्त आवश्यक ठरतो, असे सांगण्यात येते. ‘जागा आमची, संरक्षणही आमचे’ असा अलिखित नियम लातूरमध्ये आहे.

सुवर्णपदकधारी..

स्पर्धेसाठी देशभरातून अनेक गुणवत्ताधारक प्राध्यापक लातुरात शिकवणी घेण्यासाठी येतात. खास करून पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक प्राप्त करणारे प्राध्यापक चांगले पगार मिळवत आहेत.

सुसज्ज इमारती भाडय़ाने..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही मोठय़ा खासगी शिकवणी संस्था लातुरात सुरू झालेल्या आहेत. मात्र, शिकवणी वर्गाना या परिसरात नवी जागा मिळत नाही. त्यामुळे सुसज्ज इमारती भाडय़ाने घेण्याची स्पर्धा या भागात आहे.