राहाता : शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक १ जवळ ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या देणगीतून उभारलेल्या १०८ फूट उंच राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा आज, गुरुवारी उत्साहात पार पडला. हा भव्य राष्ट्रध्वज मंदिर परिसरातील एक नवीन ऐतिहासिक पर्व सुरू करणारा प्रेरणास्रोत, देशाभिमान आणि भक्तिभावाचा संगम साधणारा म्हणून साईभक्तांना प्रेरणा देत राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा खासदार नवीन जिंदाल, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, ग्रामस्थ, व साईभक्त उपस्थित होते.
गोरक्ष गाडीलकर यांनी प्रास्ताविकात ध्वजारोहणाचे महत्त्व सांगितले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार नवीन जिंदाल यानी राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. लेफ्टनंट कर्नल सुनील नरोला यांनी आभार मानले. सुत्रसंचालन श्री. कांडेकर यांनी केले.