सातारा : तब्बल ५ हजार ६४२ मीटर उंची, उणे १४ अंश सेल्सिअस तापमान, प्रतिकूल हवामान, अतिथंड वारे अशी पार्श्वभूमी असलेल्या रशिया येथील माऊंट एलब्रु शिखर साताऱ्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने सर करण्याची किमया केली आहे.
धैर्याचे वय अवघे १३ वर्षांचे असून, तिने युरोप खंड व रशिया येथील सर्वोच्च माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले. दोन मृत ज्वालामुखींपासून बनलेले हे शिखर असून, त्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल ५ हजार ६४१ मीटर (१८ हजार ५१० फूट) एवढी आहे. सगळीकडे बर्फच बर्फ, अशा स्थितीतून धैर्याचा शिखर चढण्याचा प्रवास सुरु झाला. पहिल्या दिवशी मिनरली ओडी या गावी ती पोहोचली. दुसऱ्या दिवशी आजाऊ येथे पोहाचत तिने ३ हजार मीटर उंचीची चढाई केली. तिसऱ्या दिवशी बेस कॅम्प असलेले माऊंटन हंट येथे पोहोचली. चौथ्या दिवशी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० मीटर इतकी उंची तिने सर केली. पाचवी दिवशी यशस्वी चढाई करत तिने माऊंट एलब्रुस शिखरावर तिरंगा फडकवला. हे सगळे आव्हानात्मकच होते.
उणे तापमान असल्याने प्रचंड थंडी होती. सर्वत्र बर्फच होता. हे दिव्य आव्हान तिने पूर्ण करत साताऱ्यासह भारतवासीयांची मान अभिमानाने उंचावली. या वेळी तिच्या सोबत गिर्यारोहक प्रियंका मोहिते अन्य तिघे गिर्योरहक सहभागी होते. धैर्या या मोहिमेतील सर्वात लहान मुलगी आहे. धैर्याने दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखरदेखील सर केले आहे. याशिवाय एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमही तिने पूर्ण केली आहे.
धैर्याला वयाच्या सहाव्या वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागला आहे. तिला गिर्यारोहक प्रियंका मोहिते, गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची ती मुलगी आहे.
पालकांशिवाय उंचवतेय ‘मान’
१२-१३ वर्षांची मुले पालकांच्या मागे-पुढेच करताना दिसत असतात. काही करायचे म्हटले की सोबत पालक हवेतच. मात्र, धैर्याने तिन्ही शिखर आई-वडिलांशिवाय सर केली आहेत. इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी, धैर्य आदींचे बळ सोबत घेवून ती सर्वांची मान उंचावणारी कामगिरी करत आहेत.