कुपोषण निर्मुलनासाठी ११६ विसीडिसी केंद्र सुरू

अलिबाग : महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यात १३० तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.

या प्रकरणाची गंभिर दखल प्रशासनाने घेतली असून, कुपोषित बालकांना पोषण आहार आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जिल्ह्यात ११६ ग्राम बाल विकास केंद्राची अर्थात विसिडीसी केंद्रांची सुरवात करण्यात आली आहेत. पुढील चार आठवडे या केद्रांमध्ये सर्व तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले जाणार आहेत.

शासकीय निकषांनुसार सर्वाना पोषण आहार पुरविला जाणार आहे.

महिला व बालकल्याण विभागा मार्फत रायगड जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पातील २ हजार ६०४ अंगणवाड्यांचे तसेच ६०४ मिनी अंगणवाड्यातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

यात एकुण १ लाख ४६ हजार ४५६ बालकांची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणा दरम्यान जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ४१५ बलकांच वजन घेतली गेली.

या सर्वेक्षणात तीव्र कुपोषित श्रेणीतील १३० बालके, सौम्य कुपोषित श्रेणीतील ६४७ बालके आढळून आली.

कर्जत,महाड, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. हिबाब लक्षात घेऊन महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यात ११६ ग्राम विकास केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुनपासून ती कार्यान्वयित करण्यात आली.

यात कर्जत मधील ३५, महाड मधील १४, श्रीवर्धन मधील ११, माणगाव मधील ९, म्हसळा मधील ७, अलिबाग मधील ६, तर सुधागड, उरण, मुरुड, पेण येथील प्रत्येकी ५ पोलादपुर, तळा येथील प्रत्येकी ४ तर खालापुर, रोहा येथील प्रत्येकी ३ ग्राम बाल विकास केंद्राचा समावेष आहे.

‘आरोग्य तपासणीत आजारी असलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य आणि पुरक आहार मिळेल यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मुलनासाठी सामाजिक संस्थाच्या मदत घेत आहोत.’

 – राजन सांबरे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.