वर्धा मध्ये वीज देयकाच्या थकबाकीतून मिळणाऱ्या निधीद्वारे महावितरणतर्फे गिरोली परिसरात सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची हमी दिल्याने शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. महावितरणच्या वीज वसुलीच्या धडाक्याने गावोगावी संताप व्यक्त होत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गिरोली पंचक्रोशीतील तब्बल १५६ शेतकऱ्यांनी एकरकमी थकबाकी भरीत कंपनीला सुखद धक्का दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणकडून महाकृषी उर्जा अभियान राबविल्या जात आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांनी एकरकमी थकबाकी भरल्यास त्याचा परतावा विकास निधीच्या स्वरूपात गावाला दिला जातो. थकबाकीतून प्राप्त होणाऱ्या रकमेतून ३३ टक्के रक्कम स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर खर्च केल्या जाते. तसेच परत ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर खर्च होते. याच निधीतून वीज यंत्रणेचे स्थानिक पातळीवर मजबुतीकरण करण्याचा प्रयत्न होतो.

अधिक्षक अभियंता डॉ.सुरेश वानखेडे यांनी योजनेच्या संदर्भात गावपातळीवर मार्गदर्शन केल्या नंतर देवळी तालुक्यातील गिरोली गावात शेतकºयांनी योजनेबाबत उत्सुकता दर्शविली. या सोबतच सेलु, पवनार, घोराड, रेहकी, झडशी, सिंदी, हिंगणी, अकोला, गिरोली, आंजी, महाकाळ, जामणी, म्हसाळा, चिमोडी, इंझापूर, मदणी, खरांगणा, सालोड, जामठा या गावातील शेतकऱ्यांनी तत्परता दाखवित थकबाकीस प्रतिसाद दिला. एकुण १५६ शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपाच्या वीज देयकाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरीत थकबाकीतून मुक्तता करून घेतली. त्यांचा विशेष गौरव नागपूर परिमंडळाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते झाला. कंपनीची थकबाकी मिळालीच. सोबतच गावालाही लाभ होणार असल्याचे रंगारी म्हणाले.

चालू वीज देयक भरावे लागणारच, अन्यथा वीज जोडणी तोडण्याचे निर्देश आहे. असे स्पष्ट करतांनाच डॉ.वानखेडे म्हणाले की, थकबाकीही भरण्यात मोठी सवलत आहे. एकरकमी पहिल्याच वर्षात भरल्यास ५० टक्के, दुसऱ्या वर्षात ३०टक्के व तिसऱ्या वर्षात २० टक्के देयकात माफी मिळणार आहे. महाकृषी अभियानास भरीव प्रतिसाद देणाऱ्या गिरोली ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्राच्या परिसरात २४ एकर जागा महावितरणला उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायतीचा तसा ठराव हस्तांतरित झाला आहे. या ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची हमी कंपनीने दिली. प्रकल्पातून पाच मेगाव्हॅट वीज निर्मीती अपेक्षित आहे. प्राप्त वीजेचा उपयोग याच गावात नियमीत वीज पुरवठ्यासाठी होणार आहे. सध्या आठवड्यातून तीनच दिवस आलटून पालटून कृषीसाठी पुरवठा होतो. मात्र सौर प्रकल्प झाल्यावर गावकऱ्यांना दैनंदिन वीज प्राप्त होईल. शेतकऱ्यांच्या थकबाकीतूनच गावाच्या सर्वांगीण विकासाचा हा उत्तम प्रयत्न ठरल्याचा दाखला शेतकऱ्यांनी दिला आहे. सौर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक त्या परवानगी मिळाल्यावर प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गोतमारे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 156 farmers pay lump sum arrears of electricity bills as soon as they get guarantee of solar power project msr
First published on: 22-02-2021 at 19:49 IST