सोलापूर : थांबलेल्या रेल्वे मालगाडीवर चढून स्मार्टफोनच्या साह्याने सेल्फी काढण्याचा मोह एका किशोरवयीन मुलाच्या जिवावर बेतला. मालगाडीवर चढून सेल्फी काढताना उंच विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात त्या मुलाचा विद्युत धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला.

मुस्कीत मुजाहीद जमादार (वय १७, रा. बैतूल मुनव्वर अपार्टमेंट, पानगल उर्दू प्रशालेजवळ, सिध्देश्वर पेठ, सोलापूर) असे दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. मुस्कीत हा सायंकाळी आपल्या मित्रासह सोलापूर रेल्वे स्थानकात गेला होता. तेथे फेरफटका मारताना फलाट क्र. ५ च्या बाजूला मालगाडी थांबली होती. वाघिणीवर चढून सेल्फी घेण्याचा मुस्कीत यास मोह झाला. उत्साहाच्या भरात तो मालगाडीच्या वाघिणीवर चढला आणि उभे राहून स्मार्टफोनने सेल्फी घेऊ लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा उच्च दाबाच्या उंच विद्युत तारेला त्याच्या हाताचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात मुस्कीत गंभीर भाजून जखमी झाला. त्यास रेल्वे सुरक्षा बलासह रेल्वे पोलिसांच्या पथकाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी सोलापूर रेल्वे पोलीस करीत आहेत.