मंगळवापर्यंत १९५.४१ मिमी पावसाची नोंद

पालघर : पालघर जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले, धरणे पूर्णपणे भरली आहेत. सध्या ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्य़ात १ जुलैपर्यंत एकूण २०२.३६ मिमी इतका पाऊस झाला होता, तर २ जुलैपर्यंत या पावसाची १९५.४१ मिमी इतकी नोंद झाली. ही आकडेवारी २४ तासांची आहे. जिल्ह्य़ातील सूर्या नदीची प्रत्यक्ष पातळी ८.५० मीटर इतकी पोचली आहे. वैतरणा नदी ९९.९ मीटर तर पिंजाळ नदी १०१.५५ मीटर इतक्या पातळीवर येऊन पोचलेली आहे.

सूर्या नदीची इशारा पातळी ११, तर धोक्याची पातळी १२.१० मीटर आहे. इशारा पातळीपासून सूर्या नदीने निम्म्यापेक्षा अधिक पातळी गाठलेली आहे. वैतरणा नदीची इशारा पातळी १०१.९० तर धोका पातळी १०२.६ इतकी आहे. पिंजाळ नदीची इशारा पातळी १०२.७५ एवढी असून धोक्याची पातळी १०२ मीटर एवढी आहे. पिंजाळ नदीही इशारा पातळीपासून सुमारे दोन मीटर ओलांडायची राहिलेली आहे. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.  पावसाची ही संततधार कायम राहिली तर या नद्या इशाऱ्याची पातळीही ओलांडून धोक्याच्या पातळीपर्यंत पोचतील असे चित्र सध्या दिसत आहे.

जिल्ह्य़ातील धरणाची ही स्थिती काहीशी अशीच असून जिल्ह्य़ात असलेली वांद्री, कवडास व धामणी धरणे या पावसाच्या पाण्याने भरत चालली आहेत. यापैकी कवडास धरण पूर्णपणे भरले असून यातून नैसर्गिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २ जुलैपर्यंत सकाळी या धरणातून सुमारे १७०० क्यूसेक्स पाण्याचा नैसर्गिक विसर्ग झाला. तर धामणी धरणाच्या २७६ दलघमी क्षमतेपैकी २ जुलै रोजी सकाळपर्यंत ९५.४२३ दलघमी इतका पाणीसाठा झाला.