लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला शहरात आणखी दोन जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. यापैकी एका महिलेचा काल मृत्यू झाला, मात्र त्यांचा करोना तपासणी अहवाल आज शुक्रवारी सायंकाळी सकारात्मक आला आहे. दुसऱ्या महिलेचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७ जणांचे मृत्यू झाले आहेत. ११ नवीन करोनाबाधित रुग्णांचीही आज भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २१८ वर पोहोचली. सध्या १०१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाच्या संसर्गासोबतच मृत्यूचे प्रमाणही चांगलेच वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात दोन मृत्यू व ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १६१ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १५० अहवाल नकारात्मक, तर ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१८ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १०० जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १०१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आज दोन महिला रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. फिरदोस कॉलनीमधील रहिवासी ३७ वर्षीय महिलेचा काल, १४ मे रोजी मृत्यू झाला. करोना तपासणीसाठी मृत महिलेचे नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल सकारात्मक आला. एक ६५ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाचा आज, १५ मे रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्या महिलेला ११ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या मोमीनपूरा येथील रहिवासी होत्या.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एका ३५ वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला. रुग्ण खडकी येथील निसर्ग सोसायटीतील रहिवासी आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी १० जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यातील चार जण आंबेडकर नगर, दोन जण फिरदोस कॉलनी, भीम चौक अकोट फैल येथील दोन, तर गवळीपूरा, वाशीम बायपास येथील पंचशील नगर येथील प्रत्येकी एक जण आहेत. त्यात पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

२८ जणांची करोनावर मात
अकोल्यातील आणखी २८ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील चार जण घरी, तर २४ जणांना कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले. आतापर्यंत एकूण १०० जण करोनातून बरे झाले आहेत. गत तीन-चार दिवसांमध्ये रुग्णालयातून सुटी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.