‘सोपा’च्या सर्वेक्षणाचा अंदाज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा खरीप हंगामात राज्यात झालेल्या अनियमित पावसाचा सोयाबीनला मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात सोयाबीनच्या २० टक्के क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) वर्तवला आहे.

यंदा राज्यात अनेक भागात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. राज्यात अमरावती आणि लातूर विभागात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली आहे. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के भागात सोयाबीनच्या जेएस ३३५ या वाणाची लागवड करण्यात आली आहे. सध्या पीकस्थिती समाधानकारक असली, तरी पावसाने मध्यंतरीच्या काळात मोठा खंड दिल्याने उत्पादकता घटणार असल्याचे ‘सोपा’च्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.

राज्यात यंदा ३७.९४ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक १४.०४ लाख हेक्टर क्षेत्र अमरावती विभागात तर १३.९१ लाख हेक्टर क्षेत्र लातूर विभागात आहे. राज्यात सुमारे ६.७ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाचे पावसाच्या अनियमिततेमुळे मोठे नुकसान झाले असून केवळ ४.७२ लाख हेक्टर क्षेत्रात चांगले पीक दिसून आले आहे. १९.७४ लाख हेक्टर क्षेत्रात पीक किमान समाधानकारक आहे. अमरावती विभागात २.४३ लाख हेक्टर तर लातून विभागातील २.७२ लाख हेक्टर क्षेत्रातील पीक खराब स्थितीत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ‘सोपा’ने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सोयाबीनच्या परिस्थितीविषयी माहिती संकलित केली आहे. मध्यप्रदेशातही अपुऱ्या पावसाचा सोयाबीनला फटका बसला आहे. मात्र, महाराष्ट्रातील नुकसान लक्षणीय आहे. गेल्या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनची उत्पादकता ११०२ किलोग्रॅम प्रतिहेक्टर असल्याचे ‘सोपा’च्या अहवालात म्हटले आहे. राज्यातील सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र विदर्भात आणि विशेषत: पश्चिम विदर्भात आहे. गेल्या दीड दशकांमध्ये या कापूस उत्पादक पट्टय़ात रोखीचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. अमरावती विभागात सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने सोयाबीनवर प्रक्रिया करणारे कारखाने या भागात उभे राहिले, पण पावसाची अनियमितता, भावातील अस्थिरता, मशागतीपासून ते खतांपर्यंत वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत सोयाबीनऐवजी पुन्हा परंपरागत कपाशीला पसंती देण्यास सुरुवात केली, पण अजूनही कपाशीसोबतच सोयाबीनचेच वर्चस्व या भागात आहे.

यंदा खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने सोयाबीनची उत्पादकता वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. आता सोयाबीनला शेंगा लागल्या आहेत, पण आकार लहान आहे.

उत्पादकतेत घट

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन उत्पादकतेत घट दिसून आली आहे.  २०१२ मध्ये ३२.१३ लाख हेक्टर क्षेत्रात ३८.४२ लाख मे.टन उत्पादन झाले, उत्पादकता ११९६ किलोग्रॅम प्रतीहेक्टर होते. २०१३ मध्ये ३८.७० लाख हेक्टरमध्ये ३८ लाख मे.टन उत्पादन होऊन उत्पादकता ९८२ किलोग्रॅमवर आली. २०१४ मध्ये ३८ लाख हेक्टर क्षेत्रातून ३०.७२ लाख मे.टन म्हणजे ८०८ किलोग्रॅम उत्पादकता दिसून आली. २०१५ मध्ये उत्पादकतेत पुन्हा घट झाली. ५६.१२ लाख हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. ३४.१२ लाख मे.टन उत्पादन झाले आणि ६०८ किलोग्रॅम प्रतिहेक्टर उत्पादकता होती. यंदा देखील परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 percent soybean crop damage due to inadequate rain in maharashtra
First published on: 10-09-2017 at 03:38 IST