कर्नाटकातील गुलबर्गा येथून दोन वातानुकूलित कंटेनरमधून मुंबईला जाणारे २० टन मांस अक्कलकोट येथे पोलिसांनी पकडले. ही कारवाई तीन दिवसांपूर्वीच झाली खरी; परंतु पशुचिकित्सक डॉक्टर उपलब्ध न झाल्याने हे मांस नेमक्या कोणत्या जनावराचे आहे, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. दरम्यान, जप्त केलेल्या मांसाचे नमुने हैदराबादच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
गेल्या सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास अक्कलकोट येथे सोलापूरच्या दिशेने निघालेले दोन वातानुकूलित कंटेनर पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्यात २० टन मांस आढळून आले. हे मांस गुलबर्गा येथून मुंबईकडे नेण्यात येत होते. पोलिसांनी या संदर्भात कंटेनरचालकांकडे मांस वाहतुकीसंदर्भात कागदपत्रे मागितली. मात्र यात संशय बळावल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण मांसासह दोन्ही कंटेनर जप्त केले. कंटेनरमधील मांस कशाचे आहे, याची तपासणी होण्यासाठी तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु गेले तीन दिवस तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने दोन्ही कंटेनर व दोन टन मांसाचा सांभाळ दोन दिवसांपासून पोलिसांनाच करावा लागत आहे. मात्र मांसाचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच जप्त केलेले मांस हे नेमक्या कोणत्या जनावराचे आहे, हे स्पष्ट होणार असल्याचे अक्कलकोटचे सहायक पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.