2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted: २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॅाम्बस्फोटानंतरच देशात भगवा दहशतवाद हा शब्द रुढ झाला. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी खरे तर घटनास्थळी सापडलेल्या स्कूटरवरुना या प्रकरणाची उकल करीत ‘अभिनव भारत’ या कथित संघटनेचा हात असल्याचे उघड केले होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले आणि मालेगाव बॅाम्बस्फोटांच्या तपासाला खीळ बसली, असे दहशतवादविरोधी विभागातील तत्कालीन माजी अधिकाऱ्याने सांगितले.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्याशी संबंधित स्कूटर सापडली तेव्हा सुरतपर्यंच धागेदोरे पोहोचले. त्यावेळी प्रज्ञासिंगला दहशतवादविरोधी विभागात कारवाईसाठी आणण्यात आले होते. तिची स्वत: करकरे यांनी कसून चौकशी केली. त्याचवेळी कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि स्वयंघोषित गुरु दयानंद पांडे यांना अटक केल्यानंतर साध्वीला ताब्यात घेणे त्यांना कठीण झाले नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. या अटकेबद्दल करकरे यांनी वार्ताहरांना सविस्तर माहिती दिली. त्यांचा या बॅाम्बस्फोटाशी कसा संबंध आहे हेही विशद केले.
तो दिवस होता २६ नोव्हेंबर २००८. या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. आणखीही काही महत्त्वाच्या अटक बाकी आहेत, असे त्यांनी सांगितले होते. फारसे प्रकाशझोतात न येणाऱ्या करकरे यांनी तेव्हा एका चॅनेलवर सविस्तर मुलाखत देऊन केलेल्या कारवाईचे समर्थन केले होते. मात्र त्याच रात्री दहशतवादी हल्ल्यात ते मृत्यूमुखी पडले आणि मालेगाव बॅाम्बस्फोटाचा तपास बंद पडला. त्यांच्यानंतर सूत्रे स्वीकारणारे के पी रघुवंशी यांनी या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. परंतु ती टिकली नाही.
त्याच काळात वाशी व पनवेल येथे झालेल्या बॅाम्बस्फोटात सनातन संस्थेचा कसा हात आहे, याचा शोधही करकरे यांनी घेतला होता. त्यावेळी त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस राज्य शासनाला केली होती. त्यावेळी करकरे यांच्यावर भाजपप्रणित इतर हिंदू संघटनांनी जोरदार टीका केली होती. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र एटीएसच्या कारवाईवर टीका केली होती. अल्पसंख्यांक समाजाचे चोचले पुरविण्याच्या तत्कालीन कॅांग्रेल प्रणित सरकारसाठी करकरे काम करीत असल्याचा आरोपही तेव्हा करण्यात आला होता. परंतु आपण केलेली कारवाई योग्य आहे, असे तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु तेव्हापासून भगवा दहशतवाद हा शब्द रुढ झाला.