मराठवाडय़ात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे या निवडणुकीत अक्षरश: पानिपत झाले. त्यांना १० जागांचे नुकसान तर झाले. पडझड अशी होती, की तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे प्रत्येकी ११ उमेदवार फेकले गेले. या पडझडीस ‘वरचे नियोजन’ कारणीभूत होते, अशी टीका अशोकराव चव्हाण यांनी केली. अप्रत्यक्षपणे पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधत ‘एमआयएम’मुळे काँग्रेसचे नुकसान झाल्याचे ते सांगतात.
 मराठवाडय़ातील किनवट मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार थेट नवव्या क्रमांकावर फेकला गेला. खालून पहिले येणाऱ्या उमेदवारीचे नाव आकाश जाधव असे आहे. त्यांनी किनवट मतदारसंघात निवडणूक लढविली होती. काही बडय़ा नेत्यांचाही क्रमांक खालूनच लागतो, त्यात माजी आमदार एम. एम शेख यांचेही नाव आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात ते थेट सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेस पडझडीस काही मतदारसंघात एमआयएम कारणीभूत ठरली.
  औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्रीतून कल्याण काळे वगळता अन्य उमेदवार लढतीमध्येही नव्हते. औरंगाबाद पश्चिममध्ये जितेंद्र देहाडे, गंगापूरमध्ये शोभा खोचरे, पठणमधून रवींद्र काळे, कन्नडमध्ये नामदेवराव पवार चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.  राजेंद्र दर्डा, वैजापूरमध्ये डॉ. दिनेश परदेशी  तिसऱ्या क्रमांकावर घसरले. कमकुवत संघटन, गटबाजीमुळे पोखरलेल्या काँग्रेसला फटका बसणार हे गृहीतच होते. तथापि एवढी दाणादाण होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत नव्हते. अब्दुल सत्तार यांना जागा राखण्यात यश आले.
 तुळजापूरमधून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पुन्हा गड राखला. उमरगा मतदारसंघात काँग्रेसच्या किसन कांबळे यांनी लढत दिली. मात्र, उस्मानाबादमधून विश्वास िशदे व परंडय़ातून नुरुद्दीन चौधरी चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
  जालना जिल्ह्यात जालना व परतूर या दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार लढतीत होते. जालना येथे अटीतटीची लढत झाली. मात्र, बदनापूरमध्ये सुरेश मगरे, भोकरधनमध्ये सुरेश गवळी चौथ्या क्रमांकावर राहिले. घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीचा पगडा असल्याने काँग्रेस लढतीत नव्हतीच पण येथील उमेदवार डॉ. संजय लाखे-पाटील पाचव्या क्रमांवर फेकले गेले.
 नांदेडमध्ये एमआयएम मुळे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांशी दोन हात करावे लागतील, असा भाजप-सेनेचा अंदाज होता. लातूर जिल्ह्यातील  अहमदपूर व उदगीर येथे काँग्रेसच्या उमेदवारास तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. परभणीत गंगाखेडमध्ये रविकांत चौधरी सातव्या क्रमांकावर फेकले गेले. या अनुषंगाने बोलताना काँग्रेसचे निवडणूक समन्वयक म्हणून अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका केली. राज्यस्तरावर नियोजनातच चुका झाल्या होत्या. केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी नीट झाली नाही. परिणामी अपेक्षित विजय मिळाला नाही. मराठवाडय़ात एमआयएममुळे काँग्रेसचे नुकसान झाले. ही संघटना मुस्लीम लीगसारखी जातीयवादी आहे. त्यामुळेच काँग्रेसची मोठी पडझड झाली, असे अशोक चव्हाण म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 congress candidate 3rd 4th position
First published on: 22-10-2014 at 01:49 IST