गेल्या आठ महिन्यांत २३ नक्षलवाद्यांना ठार करणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता कथित मानवाधिकार कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, या चळवळीची पाठराखण करणाऱ्या देशभरातील काही ठराविक कार्यकर्त्यांची सत्यशोधन समिती उद्या, शुक्रवारपासून गडचिरोली जिल्हय़ात फिरणार आहे.
गेल्या जानेवारीपासून गडचिरोली जिल्हय़ात झालेल्या ६ चकमकीत २३ नक्षलवादी ठार झाले तर पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला. अलीकडच्या काही वर्षांत केवळ काही महिन्यात एवढय़ा मोठय़ा संख्येत नक्षलवादी मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच काळात संपूर्ण देशात ४३ नक्षलवादी ठार झाले. त्यातील ५० टक्के नक्षलवादी गडचिरोलीत ठार झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले असतानाच आता यामुळे अस्वस्थ झालेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी नवे डावपेच आखायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेहमी या चळवळीची पाठराखण करणारे देशभरातील काही मानवाधिकार कार्यकर्ते उद्यापासून गडचिरोलीत फिरणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. मुंबई, चंडीगढ तसेच कोलकता येथून आलेल्या या कार्यकर्त्यांनी एक सत्यशोधन समिती स्थापन केली असून या समितीच्या अहवालाला जोरदार प्रसिद्धी मिळावी यासाठी नक्षलवाद्यांच्या वर्तुळातून प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या ८ जुलै ला एटापल्ली तालुक्यातील मेंढेर गावाजवळ झालेल्या चकमकीत ६ महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. या महिलांनी आत्मसमर्पणाची तयारी दर्शवून सुद्धा त्यांना पोलिसांनी ठार केले असा आरोप नंतर काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या भागात फिरल्यानंतर केला होता. यासाठी या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांचा हवाला दिला होता. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर या गावकऱ्यांनी जबाब देण्यास नकार देत कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपातील हवा काढून टाकली. या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या नक्षलवाद्यांनी आता केवळ मेंढेरच नाही तर इतर ठिकाणी झालेल्या चकमकींची चौकशी करण्यासाठी हा सत्यशोधन समितीचा पर्याय समोर केला आहे.
येत्या २३ व २४ ऑगस्ट ला ही समिती गडचिरोली जिल्हय़ात फिरणार असून सर्वप्रथम मेंढेरला भेट देणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गेल्या जानेवारीत अहेरी तालुक्यातील गोविंदगाव जवळ झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले होते. या नक्षलवाद्यांना बचावाची संधी न देताच ठार करण्यात आले असा आरोप नंतर या चळवळीकडून करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर ही समिती गोविंदगावला सुद्धा भेट देणार असल्याची माहिती आहे.