उत्तराखंड राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी (५ ऑगस्ट) ढगफुटी झाल्यामुळे धराली गावात मोठी हानी झाली. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक घरे आणि हॉटेल गाडले गेले. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ठिकठिकाणी होत असलेल्या दुर्घटनामुळे महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले ५१ पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे. यात पुण्याच्या मंचर तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील २४ जणांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या पर्यटकांची नावे दिली. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची मागणी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती दिली.
मंचर तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील पर्यटक हे एका शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी १९९० च्या दहावीच्या बॅचची त्यांनी सहल काढली होती. शुक्रवारी रात्री सर्व लोक विमानाने उत्तराखंडला गेले होते, अशी माहिती अवसरी खुर्द गावातील रहिवाश्यांनी दिली. शुक्रवार पासून त्यांच्या प्रत्येक घटनेचे अपडेट सोशल मीडियावरून मिळत होते. मात्र ढगफुटी झाल्यापासून कुणाचाही फोन लागत नसल्यामुळे आम्हाला चिंता वाटू लागली, अशी प्रतिक्रिया सहलीला गेलेल्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
दरम्यान माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही एक्सवर पोस्ट करून या पर्यटकांचा संपर्क झाला असल्याचे सांगितले. त्यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेमुळे अवसरी खुर्द, मंचर येथील सुमारे २४ नागरिक अडकले असल्याचे समजले आहे. मागील २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गंगोत्री येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत.”

“ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मी स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री मा. पुष्कर सिंह धामी आणि उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ मदतीसाठी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व बचाव यंत्रणांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका होईपर्यंत मी आणि माझी टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहोत”, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.