सावंतवाडी : केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील एकूण २५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. अलिकडेच याबाबत अधीसूचना जारी करण्यात आली असून त्यामुळे तेथील प्रस्तावित खाण प्रकल्प आता धोक्यात आले आहेत. तसेच, या गावांमध्ये आता कोणताही प्रदूषणकारी उद्याोग आणि मोठे गृहनिर्माण प्रकल्प (टाउनशिप) उभारता येणार नाहीत.

पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर आणि संदीप सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. वनशक्ती, आवाज फाउंडेशन, स्टॅलिन दयानंद आणि संदीप सावंत यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी गेल्या दशकभरापासून लढा देत असल्याचे डॉ. परुळेकर यांनी सांगितले. ही २५ गावे सह्याद्री पट्ट्यात येतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि संभाव्य प्रदूषणकारी प्रकल्प यामुळे तेथील जैवविविधतेला धोका पोहोचण्याची भीती होती. वाघांचे भ्रमणमार्ग आणि वन्यजीवांचा अधिवास लक्षात घेऊन हा भाग वाचवणे आवश्यक असल्याने २०१० पासून वनशक्ती फाउंडेशन आणि आवाज फाउंडेशने उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर २२ एप्रिल रोजी केंद्राने याबाबत अधीसूचना जारी केली. यामुळे आता कळणे येथील चालू असलेला खाण प्रकल्प पुढील पाच वर्षांत बंद करावा लागणार आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. या भागात हरित प्रकल्प हवे आहेत, ज्यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधता येईल, असे संदीप सावंत यांनी स्पष्ट केले. अधिसूचनेनंतर ६० दिवसांत नागरिक आपले मत मांडू शकतील, परंतु उच्च न्यायालयाचा पाठिंबा असल्याने या अधिसूचनेला आव्हान देणे शक्य होणार नाही.

परिणाम काय?

वृक्षतोडीवर पूर्णपणे बंदी

खाणी आणि प्रदूषणकारी प्रकल्पांना पायबंद

मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना बंदी

● लहान घरे, बंगले आणि छोटे पर्यटन प्रकल्प शक्य

हरित प्रकल्पांवर निर्बंध नाहीत

संरक्षित गावे

सावंतवाडी : कुंभवडे, असनिये, पडवे, माजगाव, भालावल, तांबोळी, सरमळे, दाभिळ, ओटवणे, कोनशी, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे, फुकेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोडामार्ग : कुंब्रल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कळणे, भिकेकोनाळ, खडपडे, भेकुर्ली, उगाडे