सांगली : पलूस तालुक्यातील आमणापूर येथे पाणी अडल्याने २५० एकर जमीन जलमय झाली असून, पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकाऊ जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत जलसंपदा विभागाने तातडीने पोटपाट खुदाई करून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी प्रयत्न करण्याची विनंती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनाही करण्यात आली आहे.

पलूस तालुक्यातील मळवाट- आमणापूर, पलूस-आमणापूर रोड येथील शेतकरी दर वर्षीच्या पाणी साचण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. पावसाळ्यात शेती जलमय होते आहे. येथील पाणी निचरा होण्यासाठी असलेला काशीकर पोटपाट गाळाने तुंबला आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी पाइप टाकून बुजवला आहे.

यामुळे सुमारे २५० एकर शेतजमीन पाण्याचा निचरा न झाल्याने नापीक होण्याच्या मार्गावर आहे. या सततच्या समस्येमुळे अनेक स्थानिक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पावसाचे पाणी साचून राहते. ज्यामुळे शेतीचा मोठा भाग क्षारपड आणि नापीक बनला आहे. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे जुना काशीकर पोटपाट पुनर्जीवित करण्यात आला. मात्र, त्याची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती झाली नसल्याने पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे अंदाजे २५० एकर सुपीक जमीन पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर आहे.