महिन्याभरापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचक विधान केलं असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या दुसऱ्या विस्तारामध्ये कोणाला नेमकी संधी मिळणार हे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यामध्ये ४३ मंत्री असतात. त्यापैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी ९ असे २० मंत्री सध्या मंत्रिमंडळात असून लवकरच अन्य २३ मंत्र्यांचा समावेश होईल असं सांगितलं आहे. “महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. ४३ मंत्री होतात. ४३ पैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी ९ मंत्री असे २० मंत्री झालेले आहेत. २३ मंत्री भविष्यात होतील,” असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

“मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार कधीपर्यंत होईल असा मला प्रश्न केला. तर यावर मी सांगेन की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा विस्तार होईल. या विस्तारामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल,” असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. आता लवकरच म्हणजे नेमका कधी हे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या आसपास हा मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

३० जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभरानंतर प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट रोजी पार पडला होता. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी देण्यात येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.