मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील घोटीनजीक हजरत निजामुद्दिन-एर्नाकुलम लक्षद्वीप मंगला एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर २६ जण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक आज, शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. अपघाताचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
हजरत निजामुद्दिनहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसने सव्वासहाच्या सुमारास घोटीजवळील रेल्वे फाटक ओलांडले आणि प्रचितराय मंदिराजवळ दहा डबे रुळावरून घसरले. अपघात एवढा भीषण होता की काही डबे पुढील डब्यांवर आदळले तर काही ५० फूट अंतरावर फेकले गेले. सुमारे शंभर मीटरहून अधिक रेल्वे रूळ पूर्णपणे उखडला गेला आहे. या अपघातात सत्यबीरसिंह यादव (४२, हरियाणा), राहुल शर्मा, राजू कुशवाह (३४, उत्तर प्रदेश) आणि अन्य एक असे चार प्रवासी जागीच ठार झाले. २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले. डाऊन दिशेकडील वाहतूक आज सकाळी ९ वाजता आणि अप दिशेकडील वाहतूक सकाळी ११ वाजता पूर्ववत होईल, अशी शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने नाशिक, इगतपुरी आणि कल्याण येथील सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अपघातातील १५ जखमींना इलाज करून सोडून देण्यात आले आहे. मात्र, ११ जण अजूनही विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मध्य रेल्वेने एका खास गाडीने इतर प्रवाशांना इगतपुरीहून एर्नाकुलमच्या दिशेने रवाना केले. गंभीर जखमींना २५ हजार रुपयांची तर साध्या जखमींना पाच हजार रुपयांची मदत रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली
स्थानिकांची मदत
सकाळी सव्वासहाला मोठा आवाज झाल्याने घोटीत घबराट पसरली. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त रेल्वेचे डबे इतस्त विखुरले होते. जखमींना आक्रोश सुरू होता. स्थानिक तरुणांनी डब्यांत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर ओढून काढले. अनेकांना प्राथमिक उपचारही दिले.
रेल्वेवाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा
घोटीनजीक झालेल्या अपघातामुळे शुक्रवारी दिवसभर नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प होती. अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर काही गाडय़ा वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या.
अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेतर्फे इगतपुरी रेल्वे स्थानकावरून एर्नाकुलमपर्यंत २२ डब्यांची विशेष गाडी सोडण्यात आली.
दुपारी रेल्वे राज्यमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रवाशांना दिलासा दिला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घसरलेले डबे मार्गावरून हलवण्याचे काम
सुरू होते.  
या अपघातामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने ३३ गाडय़ा मनमाड-दौंड-पुणे-कल्याण मार्गाने वळवल्या. यात १७ अप आणि १६ डाऊन गाडय़ांचा समावेश आहे.
त्याशिवाय भुसावळ-जळगाव-सुरत-वसई रोड या मार्गाने रेल्वेने २१ गाडय़ा वळवल्या आहेत. यात १२ अप आणि ९ डाऊन गाडय़ांचा समावेश आहे.
याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्सप्रेस (दोन्ही बाजूंनी), लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस (दोन्ही बाजूंनी), छत्रपती शिवाजी टर्मिनस-मनमाड पंचवटी एक्सप्रेस (दोन्ही बाजूंनी) आणि पुणे-भुसावळ-पुणे या चार गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 dead 37 injured as mangala express derails near nashik
First published on: 15-11-2013 at 08:16 IST