पौर्णिमेच्या जोतिबा दर्शनाच्या वारीसाठी निघालेल्या जोतिबाभक्तांच्या टाटा सुमो जीपचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर नऊ जण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाटय़ाजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व जखमी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील आहेत. अपघाताची नोंद कुरळूप पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
अपघातात श्यामराव चंदू भाटे (वय ५५, रा. मालदन-वडजाईनगर), शंकर ज्ञानदेव सुतार (वय ४०, रा. सुतारवाडी ता. पाटण) यांचा जागीच मृत्यू झाला. अतुल बाळासाहेब चोरगे (वय ३४, रा. मानेवाडी), यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अर्चना जिवलग माने (वय २७), लीलाबाई तुकाराम पाचुरकर (वय ६५), प्रशांत महादेव अडसरकर (वय ३५, तिघेही रा. मानेवाडी), प्रकाश मारुती पेंढारी (वय ३५), प्रकाश बाबुराव पवार (वय ३६), विजय किसन पेंढारकर (वय ३२, तिघेही रा. मालदन), भरत शंकर म्हात्रे (वय ४२, रा. म्हात्रेवाडी), कृष्णत बाबू चोरगे (वय ४७, रा. गलमेवाडी) व सुहास खाशाबा पाटील (वय ३३ रा. ढेबेवाडी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. जखमींना इस्लामपूर येथील राजारामबापू हॉस्पिटल व कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील हे भक्तगण टाटा सुमो (क्र. एम. एच. ११, ४३ ए ८८८६) या जीपमधून जोतिबाच्या दर्शनासाठी अगदी सकाळच्या प्रहरी निघाले असता, येडेनिपाणी फाटय़ाजवळ सुमो जीपचा पाठीमागील टायर फुटल्याने गाडीवरील चालकाचा ताबा सुटून जीपने चार-पाच कोलांटउडय़ा खात सेवा रस्त्यावरील नाल्यात जाऊन ही जीप उलटी झाली. अपघाताचा आवाज जोरात आल्याने व जीपमधील लोकांच्या किंकाळय़ांमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. अपघातात जीपचा चक्काचूर झाला होता. स्थानिक नागरिकांनी जीपमधील प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. मात्र, श्यामराव भाटे व शंकर सुतार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अतुल चोरगे यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली.