रयतेचे स्वंतत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ रोजी झाला. छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे ते अधिपती झाले.
ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेकदिन विविध उपक्रम किल्ले रायगडावर साजरे केले जातात. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या वर्षी ३४० वा शिवराज्याभिषेक सोहळा बुधवार, दि. ५ आणि गुरुवार, दि. ६ जून या कालावधीमध्ये साजरा होत असून हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
समितीचे सदस्य रघुवीर देशमुख यांनी महाडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. गडावर या वर्षी दोन हजारांपेक्षा अधिक महिला उपस्थित राहणार असल्याने त्यांची पाचाड ग्रामस्थांनी राहण्याची सोय केली असल्याचे ते म्हणाले त्याच प्रमाणे पन्नास हजारांपेक्षा अधिक शिवभक्त सोहळय़ामध्ये सहभागी होण्यासाठी येत असल्याने गडावर सर्व सोयीसुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच जोग कंपनीकडून खास सोहळय़ास येणाऱ्या शिवभक्तांसाठी रोपवेच्या शुल्कामध्ये सवलत ठेवण्यात आली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून महती असणारा शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा. प्रेरणादायी शिवचरित्र भावी पिढीत रुजावे हा उपक्रमाचा हेतू आहे, तसेच शिवछत्रपतीच्या गड-कोट-किल्ल्यांचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे आणि त्यांचा पर्यटनदृष्टय़ा विकास व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन केले जाते. समितीतर्फे दि. ५ जून रोजी गडाची सजावट होणार आहे. यामध्ये रायगडावरील मेघडंबरी, नगारखाना, जगदीश्वर मंदिर, शिवछत्रपतींची समाधी आदी वास्तूंची स्वच्छता आणि सजावट करण्यात येईल. गडपूजनानंतर शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके होतील.
दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये शिवचरित्रावरील व्याख्यान, पोवाडे, नाटिका यांचे सादरीकरण होईल. गडावरील सर्व कार्यक्रम युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रघुवीर देशमुख यांनी दिली.
६ जून रोजी पहाटे ५.३० वाजता गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर भगव्या ध्वजाचे आरोहण, ६ वाजता राजसदरेवरील कार्यक्राचा शुभारंभ, सकाळी ८ वाजता राजसदर येथे शाहिरी मुजऱ्याचा कार्यक्रम, ९.३० वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे राजसदरेवर आगमन, १० वाजता शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारांत युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिषेक, त्या नंतर मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीस युवराज संभाजी महाराज यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, पारपरिक कार्यक्रमांनंतर युवराज छत्रपती संभाजी महाराज शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असन त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर जगदीश्वर मंदिर समाधीस्थळ येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2013 रोजी प्रकाशित
किल्ले रायगडावर ६ जूनला ३४० वा राज्याभिषेक सोहळा
रयतेचे स्वंतत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ रोजी झाला. छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे ते अधिपती झाले. ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेकदिन विविध उपक्रम किल्ले रायगडावर साजरे केले जातात.
First published on: 02-06-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 340th the coronation ceremony at rayagada fort on june