वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने ‘माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. या घटनेनंतर त्याने आनंद व्यक्‍त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केले,’ अशी साक्ष न्यायालयात दिली. दरम्यान, आता पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशात हादरवणार्‍या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते. माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या व सोन्याच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली.

परंतु न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी दोन जानेवारीला होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सुनावणीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खटल्याच्या कामकाजाशी संबंधितांशिवाय इतर कोणालाच न्यायाधीशांच्या दालनात प्रवेश नव्हता.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 36 murdered santosh court joyti mandhare nck
First published on: 20-12-2020 at 11:59 IST