हिंगोली: कळमनुरी-नांदेड महामार्गाववर दातीफाटा शिवारात फ्रिज घेऊन जाणारा कंटेनर पेटल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दिल्लीहून चेन्नईकडे १२० फ्रिज घेऊन जाणारा कंटेनर महामार्गावरून जात असताना कंटेनरच्या केबिनमधून अचानक धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले, परंतु तोपर्यंत केबिनला आग लागली होती. चालकाने तात्काळ केबिनमधून उडी घेतली, पण काही वेळातच आग संपूर्ण कंटेनरमध्ये पसरली आणि सुमारे ४० फ्रिज जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे व पथक घटनास्थळी दाखल झाले. अर्धापूर व कळमनुरी अग्निशमन दलाच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कंटेनरचे केबिन आणि मोठ्या प्रमाणात माल जळून नुकसान झाले असून नुकसानाची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक तपासानुसार, केबिनमधील बॅटरीतून शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मदतीने सुस्थितीत असलेले फ्रिज खाली काढण्यात आले असून रात्री उशिरा पोलिस ठाण्यात घडल्या घटने संदर्भात नोंद झाली आहे.