सूत्रधाराला पकडण्याचे सोलापूर पोलिसांपुढे आव्हान
कायदा धाब्यावर बसवून सेव्हन हिल्स रिअॅलिटिज प्रा. लि. व सेव्हन हिल्स विविधोशा सोहार्द सहकारी संस्था या दोघा संस्थांनी मिळून कर्नाटकासह आंध्र, तामिळनाडू व महाराष्ट्रात सुमारे एक लाख ठेवीदारांना सुमारे ४५० कोटींचा गंडा घातल्याची माहिती सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्याचे गांभीर्य पाहता या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी पुढे येत आहे.
महाराष्ट्रात सोलापूर शहर व परिसरात या कंपन्यांनी ठेवीदारांना फसविले असून यात पीडित ठेवीदारांची संख्या सुमारे दीड हजार इतकी असून त्यापैकी ३६२ जणांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रथमदर्शनी एक कोटी ११ लाखांइतका घोटाळा आढळून आला तरी प्रत्यक्षात तो तीन कोटी ६० लाखांपर्यंत आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी ७ एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळासह व्यवस्थापक व वरिष्ठ एजंटासह बारा जणांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या सर्व आरोपींना सहजिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांच्या समोर हजर केल्यानंतर पोलीस तपास अधिकारी सचिन पवार यांनी वाढीव पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. त्यानुसार एन. प्रसाद नरसिंहा रेड्डी (चिक्कबलापूर, कर्नाटक), नागराज रेड्डी नानजा रेड्डी (कृष्णगिरी, तामिळनाडू), रघुवीर प्रेमसिंग नायक (विजापूर, कर्नाटक) यांच्यासह प्रसाद बाबासाहेब ताड व विशाल दत्तात्रेय मोरे (दोघे रा. सोलापूर) या आरोपींना १९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेळी सरकारतर्फे अॅड. आनंद कुर्डूकर तर आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे व गुरूदत्त बोरगावकर यांनी पाहिले. दरम्यान, उर्वरित आरोपींपैकी कंपनीचा अध्यक्ष जी. नारायणआप्पा (मालूर, कर्नाटक) याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्यावर बंगळुरू येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यासह अन्य आरोपींना अटक करून सोलापुरात आणण्याचे आव्हान आर्थिक गुन्हे शाखेसमोर राहिले आहे.
कर्नाटक सीआयडीने दोन्ही कंपन्यांच्या संचालकांसह सर्व आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. सध्या हे सर्व आरोपी जामिनावर सुटले असून त्यांना बंगळुरूच्या पोलिसांकडे आठवडय़ातून एक दिवस हजेरी द्यावी लागत आहे. तरीही तेथील पोलीस सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला संबंधित आरोपींना ताब्यात देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे तपास अधिकारी सचिन पवार यांनी नाराजीच्या सुरात म्हटले आहे.
सेव्हन हिल्स रिअॅलिटिज इंडिया प्रा. लि. या कंपनी व सेव्हन हिल्स विविधोशा सोहार्द सहकारी संस्था या दोन्ही फर्मचा घोटाळ्यात सहभाग आहे. या दोन्ही कंपन्यांचा अध्यक्ष जी. नारायणआप्पा हाच आहे. सेव्हन हिल्स रिअॅलिटिज इंडिया प्रा. लि. या कंपनीने रिझव्र्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्सचा परवाना न घेताच ठेवी गोळा केल्या तर सेव्हन हिल्स विविधोशा सोहार्द सहकारी संस्थेची नोंदणी कर्नाटक सोहार्द (सहकारी) कायद्याखाली झाली असून त्यानुसार या संस्थेला कर्नाटकातच व्यवसाय करता येतो. परंतु कायद्याचे उल्लंघन करून या संस्थेने कर्नाटकाबाहेर महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कोटय़वधींच्या ठेवी गोळा केल्या आहेत. या दोन्ही कंपन्या दीड वर्षांपूर्वी अवसायनात निघाल्या असून ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवीच्या रकमा अदा करण्यासाठी कर्नाटकातील कंपनीच्या २१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ‘सेव्हन हिल्स’च्या संचालक मंडळावर वाहनचालकासारख्या काही नाममात्र व्यक्तींचा समावेश आहे. दोन्ही कंपन्यांचा अध्यक्ष जी. नारायणआप्पा हाच या कोटय़वधींचा घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.