Criminal Charges Against Indian Ministers: एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती अहवालाद्वारे जाहीर केली आहे. या माहितीनुसार केंद्र आणि विविध राज्य सरकारांमध्ये असलेल्या मंत्र्यांपैकी जवळपास अर्ध्या मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खून, अपहरण आणि महिलांवरील अत्याचार असे गंभीर स्वरुपाचेही गुन्हे काही मत्र्यांवर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, केंद्र आणि राज्यातील एकूण ६४३ मंत्र्यांपैकी ३०२ मंत्र्यांवर म्हणजेच ४७ टक्के जणांवर विविध गुन्हे दाखल आहेत. ही माहिती संबंधित मंत्र्यांनीच त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात उघड केलेली आहे. ३०२ पैकी १७४ मंत्र्यांवर खून, अपहरण आणि महिलांवरील अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ३० दिवस कारावास भोगणाऱ्या विद्यमान मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधेयक केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर केले. त्यानंतर काही दिवसांनी एडीआरचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २० ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले हे विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात आले आहे.
भाजपाच्या किती मंत्र्यांवर गुन्हे दाखल?
एडीआरच्या अहवालात पक्षनिहाय आकडेवारी सादर करण्यात आली आहे. भाजपाचे केंद्र आणि विविध राज्यात मिळून ३३६ मंत्री आहेत. त्यापैकी १३६ मंत्र्यावर (४० टक्के) गुन्हे दाखल आहेत. यापैकी ८८ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सत्ताधारी एनडीएतील तेलगू देसम पक्षाच्या २३ मंत्र्यांपैकी २२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १२ जणांवर गंभीर स्वरुपाचे खटले दाखल आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मंत्र्यावरील गुन्हे?
शिवसेनेच्या (शिंदे) १३ मंत्र्यांपैकी ७ मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालातून समोर आले आहे. तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील १० पैकी ३ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. तीनही मंत्र्यांवरील गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत, अशी माहिती एडीआरने दिली आहे.
इतर पक्षांची स्थिती काय?
काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाचीही आकडेवारी समोर आली आहे. काँग्रेसचे विविध राज्यात असलेल्या ६१ मंत्र्यांपैकी ४५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १८ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. आम आदमी पक्षाचे १६ आणि त्यापैकी ११ जणांवर गंभीर गुन्हे आहेत.
इतर पक्षांची आकडेवारी
- तृणमूल काँग्रेस : ४० पैकी १३ मंत्र्यांवर गुन्हे
- द्रमुक : ३१ पैकी २७ मंत्र्यांवर गुन्हे
- जनता दल (यू) : १४ पैकी ४ मंत्र्यांवर गुन्हे
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : १० पैकी ३ मंत्र्यांवर गुन्हे

आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हेगार मंत्री
आंध्रप्रदेश विधानसभेतील २५ पैकी २२ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहे. हे प्रमाण ८८ टक्के इतके आहे. त्याखाली उत्तर प्रदेश विधानसभेचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशच्या ५३ मंत्र्यांपैकी २९ गुन्हेगार असून हे प्रमाण ५५ टक्के आहे. त्यानंतर तमिळनाडूमध्ये ३१ पैकी २७ मंत्र्यांवर गुन्हे आहेत. तर महाराष्ट्र विधानसभेतील ४१ पैकी २५ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १६ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.