मालमोटार व क्रुझर जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाचजण ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. उमरगा-आळंद मार्गावर खजुरी सीमेजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातील सर्व मृत व जखमी कर्नाटकातील सेडम गावचे आहेत.
सेडम येथून आठ तरुण धूलिवंदनाच्या रात्री गोवा व महाराष्ट्रात फिरण्यासाठी क्रुझर गाडीतून आले होते. सकाळी सहाच्या सुमारास उमरगा चौरस्ता येथे चहापान करून ते सेडमला जाण्यास निघाले. खजुरी सीमेजवळ गुलबग्र्याहून लातूरकडे निघालेल्या मालमोटारीची  त्यांच्या वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महंमद माजीद शालुवाले (२२), मौलाली हैदरसाब मुल्ला (२३, क्रुझर चालक), शेख शेरअली मकतुमअली शेख (२२) व अमिनोद्दीन बंदेआली शेलार (२२) हे जागीच ठार झाले. शेख मंजूर शेख रफिक (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.