शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव परिसरात मध्यरात्री अवजड मालवाहू ट्रकने (कंटेनर) मोटारीला धडक दिली. या दुर्घटनेत मोटारीतील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोटारचालक संजय म्हस्के आणि कुटुंबीय नगरहून पुण्याकडे मोटारीतून येत होते. त्या वेळी एक कंटेनर विरुद्ध दिशेने आला. रांजणगाव परिसरातील कारेगावजवळ एस नाइन हॉटेलसमोर कंटेनरने मोटारीला धडक दिली. त्यानंतर कंटनेर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळला. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलीसांनी सांगितले. मोटारचालक संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राजवीर ऊर्फ राजू राम म्हस्के (वय ७), हर्षदा राम म्हस्के (वय ४), विशाल संजय म्हस्के (वय १६, सर्व रा़ आवाणे बुद्रुक, ता़ शेवगाव, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात साधना राम म्हस्के (वय ३५) गंभीर जखमी झाल्या आहेत.

मुलांना सूखरुप घरी आणणारे म्हस्के काका गेले..

पनवेल : या अपघातात पनवेल तालुक्यातील शिलोत्तर रायचुर (सूकापूर) परिसरातील प्रयाग आंगन सोसायटीत राहणाऱ्या म्हस्केबंधूसह त्यांच्या कुटूंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. या सोसायटीमधील रहिवाशांना ही माहिती कळताच शोक अनावर झाला. संजय आणि त्यांचा भाऊ शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी गाडी चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. विद्यार्थ्यांना सुखरुप घरी सोडणारे   म्हस्के बंधू ही त्यांची परिसरात ओळख होती. प्रयाग आंगन या सोसायटीचे सचिव निलेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनूसार संजय हे वेळोवेळी सोसायटीतील विविध उत्सवांना त्यांच्या दूकानातून किराणा वस्तू मोफत वाटून सण साजरा करण्यास प्रोत्साहन देत. रात्रीच्यावेळेस परिसरातील रहिवाशांच्या अडीअडचणींसाठी ते धाऊन जात असत. मुलांच्या सूरक्षेसोबत सामाजिक कार्यातही ते पुढाकार घेत.

मुलीचा विवाह सोहळा पार पाडल्यानंतर..

अपघातात मृत्युमुखी पडलेले म्हस्के कुटुंबीय कामानिमित्त नवी मुंबईतील पनवेल परिसरात वास्तव्यास आहे. संजय म्हस्के शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस चालवितात. त्यांचा भाऊ राम रिक्षाचालक आहे. मनमिळाऊ स्वभावाचे म्हस्के बंधू प्रत्येकाला मदत करायचे. म्हस्के यांचा भाऊ राज याचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. संजय यांच्या मागे दोन मुली, दोन मुले, आई असा परिवार आहे. आई गावात राहते. संजय यांच्या एका मुलीचा १५ ऑगस्ट रोजी विवाह पार पडला. एका मुलीचा साखरपुडा झाला होता. मुलीचा विवाह सोहळा पार पाडून संजय आणि म्हस्के कुटुंबीय पनवेलकडे मध्यरात्री मोटारीतून निघाले होते.