पूर्व विदर्भातील गावक ऱ्यांची पाण्यासाठी वणवण
तापमान ४५ अंशांवर गेल्याने पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या चार जिल्ह्य़ांतील ५ हजार ९५७ ‘मामा’ (माजी मालगुजारी) तलावांपैकी बहुतांश तलावांतील पाणी आटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.
पूर्व विदर्भात एकूण ५ हजार ९५७ मामा तलाव आहेत. यात नागपूर जिल्हय़ात २१७, चंद्रपूर १६७८, गडचिरोली १६४५, भंडारा १०२१ तर गोंदिया जिल्ह्य़ात १३९२ तलाव आहेत. ब्रिटिश राजवटीपूर्वीच्या मालगुजारीच्या काळात तयार करण्यात आलेले हे तलाव सिंचनासाठी आजवर अतिशय उपयुक्त ठरत आले आहेत. गेल्या अनेक वर्षांंपासून या तलावांवर ग्रामीण भागातील लोकांची तहान भागत असे. बहुतांश तलावांवर महिला कपडे, धुणीभांडी यासारखी छोटी कामेही करीत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तलावांच्या खोलीकरणासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे सुरू आहेत. मात्र, उष्णतेच्या लाटेमुळे पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांमधील मामा तलाव आटल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्ली, लोहारा या गावात मोठे मामा तलाव आहेत. पाणी आटल्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात हे तलाव गावातील गुराढोरांची तहान भागवित होते. आता या पाळीव प्राण्यांनाही पाणी मिळेनासे झाले आहेत. घोडपेठ, लोहारा येथील तलावांचे खोलीकरण सुरू आहे. त्यामुळे तेथील तलावात एक थेंब पाणी शिल्लक नाही. हीच स्थिती गोंदिया व भंडारा या जिल्ह्य़ातही बघायला मिळाली. नवेगांव, नागझिरा, साकोली या परिसरातील मामा तलावांनाही पाणी राहिलेले नाही, त्यामुळे त्या परिसरातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात ग्रामीण भागात हीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्य़ांत सर्वाधिक अनुक्रमे १६७८ व १६४५ मामा तलावांची संख्या आहे. यातील बरेच नादुरुस्त व अनेक ठिकाणी खोलीकरण सुरू असल्यामुळे पाणी बघायलासुध्दा मिळत नाही. अशाच पध्दतीने उन्हाची तीव्रता राहिली तर ज्या मामा तलावांमध्ये पाणी शिल्लक आहे तेथील पाण्याची पातळी देखील कमी होईल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2016 रोजी प्रकाशित
उष्णतेच्या लाटेने ५ हजार ‘मामा’ तलाव आटले
चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्ली, लोहारा या गावात मोठे मामा तलाव आहेत.
Written by रवींद्र जुनारकर

First published on: 20-04-2016 at 01:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 thousand lakes dried up due to heat wave