कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात पाऊस कोसळू लागला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी ऊनपावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या ३६ तासांत धरण क्षेत्रात सरासरी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजमितीला कोयनेचा पाणीसाठा १९.३ टीएमसीने कमी आहे. उपयुक्त पाणीसाठय़ाच्या तुलनेत गतवर्षी तिप्पट पाणीसाठा उपलब्ध होता.
सध्या कोयना धरणाची पाणीपातळी २,०४२.८ फूट असून गतवर्षी हीच जलपातळी २,०८४.६ फूट होती. तर पाणीसाठा १५.११ टीएमसी (१४.३५ टक्के)असून, तो गतवर्षी ३४.४१ टीएमसी (३२.६९ टक्के) होता. आजमितीला कोयना जलाशयात ९.९९ टीएमसी (९.४९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा असून, गतवर्षी हाच उपयुक्त पाणीसाठा २९.२९ टीएमसी (२८.८२ टक्के)एवढा होता. सध्या धरणाचा पाणीसाठा काहीअंशी कमीच होत आहे. गतवर्षी मात्र आजअखेर ३ टीएमसी पाण्याची भर कोयना धरणात  झाली होती. १ जूनपासून कोयना धरण क्षेत्रात सरासरी ९८.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाखालील पाटण तालुक्यात ६३.८३, तर कराड तालुक्यात ५७.४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजमितीला कोयना धरण क्षेत्रात सरासरी ५८६.७५, पाटण तालुक्यात २०४.५, तर कराड तालुक्यात ९४.८६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. आज दिवसभरात धरण क्षेत्रात हलक्याभारी सरी कोसळल्या, तर कराड व पाटण तालुक्यांत ढगाळ वातावरण राहताना पावसाची रिमझिम राहिल्याचे वृत्त आहे.