सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळबांबर्डे (ता. कुडाळ)येथे एका खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्ग दुरुस्तीच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे.

ही घटना कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे महामार्ग येथे घडली. मृत महिला सौ. लक्ष्मी गणपत आबंडोसकर (वय ५९, रा. पाल, ता. वेंगुर्ला) आहेत. त्या आपल्या ३२ वर्षीय मुलासोबत, रोहन आबंडोसकर, यांच्या दुचाकीवर होत्या. रोहन आबंडोसकर हे कणकवली येथील महावितरण कार्यालयात कार्यरत आहेत. ते आपल्या आईला घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने आपल्या गावी, पाल येथे, जात असताना हा अपघात घडला.

​वेताळबांबर्डे बॉक्सेलजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने बुजवण्यात आले होते. मात्र, एका खड्ड्याची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती. तो खड्डा रस्त्याच्या पातळीपेक्षा जास्त उंच ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी एक उंचवटा तयार झाला होता. रोहन यांची दुचाकी त्या उंचवट्यावर चढल्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते दोघेही गाडीवरून खाली फेकले गेले.

​या अपघातात सौ. लक्ष्मी आबंडोसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हवालदार नारायण गंगावणे आणि पोलीस नाईक रुपेश गुरव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली अडुकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ​हा अपघात महामार्ग ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळेच झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.