श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर येथील तलावात शुक्रवारी शेतीसाठी माती खोदताना सहा मानवी सांगाडे सापडले आहेत. खोदलेल्या खड्डय़ातील मातीच्या ढिगा-याखाली आणखी १० ते १२ सांगाडे आसल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यासह बेलवंडीचे निरीक्षक नारायणराव वाखारे, श्रीगोंदे येथील निरीक्षक शशिराज पाटोळे हे पोलिस पथकासह पोहोचले आहेत.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर तलाव हा पाणी आटल्याने कोरडा पडला आहे. त्यामुळे तलावातील माती शेतकरी शेतीसाठी नेत आहेत. जवळच खुले कारागृहदेखील आहे. या तलावातील माती खोदण्यासाठी एका शेतक-याने जेसीबी लावला होता. सुमारे १० ते १२ फूट खोल खोदले असता या मातीमध्ये मानवी सांगाडे आढळून आले. यामध्ये सांगाडयाची हाडे, कवटी, तोंडातील दात, छातीची व मणक्याची हाडेदेखील चांगल्या अवस्थेत आहेत.
हे मानवी मृतदेह सांगाडे एवढया मोठय़ा प्रमाणात येथे कसे आले, हे सध्या तरी गूढच आहे. एकाच खड्डय़ामध्ये सगळे सांगाडे असणे ही बाब गंभीर मानली जाते. याबाबत परिसरातील शेतकरी गणपतराव जठार यांना विचारणा केली असता फार पूर्वी येथे प्लेगची साथ मोठय़ा प्रमाणात आली होती असे त्यांनी सांगितले. मात्र प्लेगच्या रुग्णाचा मृतदेह जाळण्यात येत असे. शिवाय इतकी वर्षे पाण्यात हे सांगाडे टिकणार नाही असाही अंदाज व्यक्त होतो. त्यामुळेच या प्रकाराने सारेच चक्रावले असून याबाबत गूढ निर्माण झाले आहे. फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) प्रयोगशाळेत बहुधा याचा कालावधी समजू शकतो. त्यानंतरच हे सांगाडे नेमके हे किती वर्षांपूर्वीचे आहेत हे समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. याबाबत तालुक्यात अफवांनाही उधाण आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
विसापूरला ६ मानवी सांगाडे आढळले
श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर येथील तलावात शुक्रवारी शेतीसाठी माती खोदताना सहा मानवी सांगाडे सापडले आहेत. खोदलेल्या खड्डय़ातील मातीच्या ढिगा-याखाली आणखी १० ते १२ सांगाडे आसल्याचे दिसत आहे.

First published on: 26-07-2014 at 04:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 human pyramid found in visapur