राज्यात एकीकडे करोनाची लाट ओसरल्याचे दिसत असताना आता हळूहळू ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून येताना दिसत आहेत. आज राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या २८ वर पोहचली आहे.

राज्यात आज आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आजपर्यंत राज्यभरात आढळून आलेल्या २८ ओमायक्रॉन बाधितांपैकी ९ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.

याचबरोबर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६८४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६८६ रूग्ण कोरनामुक्त झाले आहेत. याशिवाय २४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६६,४५,१३६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत ६४,९३,६८८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, १,४१,२८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ६ हजार ४८१ आहे.