अहिल्यानगर : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून ८० घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत व हायजिन फर्स्ट संस्थेच्या प्रमुख वैशाली गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील कचरा संकलन करण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेची मनपाकडून नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत ८० घंटागाड्या घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणार आहे.
या वेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. ती आता दूर होईल. शहरात रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. काही संस्थांच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत.
आयुक्त डांगे म्हणाले, की घंटागाडी आपल्या घरी आली नाही तर नागरिकांनी हेल्पलाइनवर फोन करावा. तातडीने घंटागाडी उपलब्ध होईल. देशांमधील स्वच्छतेच्या स्पर्धेत ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रात नगर महापालिकेने देशात पाचवा क्रमांक मिळवला. आता प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीमध्येच टाकावा.
वैशाली गांधी यांनी, ‘हायजिन फर्स्ट’ संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ शहर बनवण्याचे काम सुरू आहे. घराप्रमाणेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, उपायुक्त संतोष टेगळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले, मनोज कोतकर, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपडा, रेश्मा आठरे, लता शेळके, निखिल वारे, सचिन जाधव, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, आदी उपस्थित होते.
उपयुक्तांनी शहरात फिरावे
घंटागाडी घरासमोर येऊनही काही नागरिक गटारी, नालीमध्ये कचरा टाकतात. बांधकाम साहित्यामुळे गटारी बंद झाल्या आहेत. मनपाने आजपर्यंत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली नाही. परंतु पुढील काळात जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल, त्याच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना जर काम करायचे नसेल, तर त्यांनी त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. त्यांनीही शहरात फिरून काम केले पाहिजे अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला.
