चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.

अजयपूर गावाजवळ गुरुवारी मध्यरात्री रात्री २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडाला. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. मात्र ही आग इतकी भीषण होती की मरण पावलेल्या सर्व नऊ जणांचे मृतदेह या आगीत जळून खाक झाले.

या दुर्घटनेत मरण पावलेल्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही देण्यात आलीय. “चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा केली आहे,” असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलंय.

नक्की घडलं काय?
गुरुवार १९ मे २०२२ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूर ला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर क्रमांक एमएच ४० बीजी ४०६० या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली. आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले नऊ जण जळून खाक झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांची ओळख पटली…
लाकूड भरलेल्या ट्रकमध्ये वाहनचालक ३० वर्षीय अजय सुधाकर डोंगरे (रा. बल्लारपूर), ३३ वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, ३० वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, २५ वर्षीय महिपाल परचाके, ४६ वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, ४० वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे (रा. नवी देहली), २२ वर्षीय संदीप रवींद्र आत्राम (रा. तोहोगाव कोठारी) हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. तर डीझेल टँकर मधील वाहनचालक ३५ वर्षीय हनिफ खान (रा. अमरावती), कंडक्टर ३५ वर्षीय अजय पाटील (रा. वर्धा) हे दोघेही ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मृत पावले.