कोकणातल्या एका गावातील नागरिकांनी गावात जातीय सलोखा राखण्यासाठी एक अनोखा करार केला आहे. मुंबईपासून २२८ किमी. अंतरावर असलेल्या कोकणातील बुरोंडी या गावातील नागरिकांनी हिंदू आणि मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे. सुमारे चार हजार लोकांची वस्ती असलेल्या या गावाने जातीय संघर्ष टाळण्यासाठी ही क्लृप्ती लढवली आहे. गावात दोन्ही धर्मांच्या नागरिकांसाठी आचारसंहिता देखील आखण्यात आली आहे.   
गावात करण्यात आलेल्या या तीन पानी करारात अनेक कलमांचा समावेश करण्यात आला आहे. उदा. गावातून हिंदू धार्मीयांतील नागरिकांची मिरवणूक निघाली असताना ते मशीदीजवळून जातानाही बँड वाजवू शकतात मात्र, त्याच वेळी नमाज सुरू असल्यास मशिदीपासून थोड्या अंतरावर मिरवणूक थांबवावी आणि नमाज पूर्ण झाल्यावरच पुढे जावे, अशा प्रकारची दोन्ही धर्मांना समावून घेतील अशी कलमे या करारत समाविष्ट करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर, दहीहंडीदरम्यान गोविंदा पथकातील तरुण गावातील मशिदीच्या परिसरातूनही उत्साहाने जातील आणि त्याचवेळी दर्ग्यासमोर नतमस्तक सुद्धा होतील. याचसोबत गावातील हिंदू नागरिक दर्ग्याच्या वार्षिक उत्सवादरम्यान मदत देखील करतील, असेही करारामध्ये नमूद करण्यात आले आहे. दोन्ही धर्मांचे नागरिक एकमेकांचे उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करतील आणि आवर्जुन सहभागी होतील. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात मंचावर दोन्ही धर्मांचे नागरिक उपस्थित असले पाहिजेत, असेही हा करार सांगतो. दरम्यान, सध्या या गावातील लोकसंख्येपैकी वीस टक्के मुस्लिम नागरिक असून कोकणातील इतर गावांप्रमाणे या गावातही जातीय सलोखा टिकून राहिला आहे.