Ramdas Kadam On Shivsena : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाच्या काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे चांगलंच राजकारण तापलं होतं. मंत्री योगेश कदम यांच्यावर सावली बारच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आरोप केले होते. एवढंच नाही तर मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही परब यांनी केली होती.

तसेच अधिवेशनाच्या दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेली बॅगेसह एक व्हिडीओ समोर आला होता. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच अधिवेशनाच्या दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरणही चांगलंच चर्चेत आलं होतं. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने बोलताना आता शिवसेनेचे नेते ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जातय का?’ असा संशय असल्याचं रामदास कदम आज एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“शिंदे साहेब आपल्याला याच्या खोलपर्यंत जावं लागेल. मला एक संशय असा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनाच बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जातयं का? असा संशय माझ्या मनात आहे”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अनिल परबांनी योगेश कदम यांच्यावर काय आरोप केले होते?

शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला होता. योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत सावली नावाचा डान्सबार आहे. पोलिसांनी अलीकडेच या बारवर धाड टाकून २२ बारबालांना ताब्यात घेतलं होतं. “महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा प्रश्न देखील अनिल परब यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी योगेश कदम यांच्यावर कारवाई करण्याची, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती.

पैशांनी भरलेली बॅग प्रकरणात शिरसाटांवर झाले होते आरोप

शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली होती. या व्हिडीओमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले दिसत होते. तसेच त्यांच्या शेजारी एक पैशांनी भरलेली बॅग दिसली होती. संजय राऊत यांनी व्हिडीओ समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर संजय शिरसाटांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, “व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या बॅगेत कपडे आहेत. मात्र ते पैसे असल्याचे सांगितले जात आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक असे व्हिडीओ व्हायरल करत आहे. मात्र अशी बदनामी केली तरी त्याचा आमच्या कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.”