विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एका व्यक्तीने आपल्या मुलासहित एक्स्प्रेस ट्रेनखाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी या व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या मुलासह डेक्कन क्वीनखाली उडी मारून आत्महत्या केली. ट्रेनच्या खाली आल्यानंतरही मुलगा आश्चर्यकारकरित्या सुखरुप बचावला आहे.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. प्रमोद आंधळे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. ते उल्हासनगरमधील शांतीनगर भागात राहातात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, “प्रवाशाने मुलासह डेक्कन क्वीनखाली उडी मारली. उडी मारताना चार वर्षाचा मुलगा या प्रवाशाच्या तावडीतून सुटून रुळांच्या मध्यभागी पडला. दोन रुळांच्या फटीमध्ये पडल्याने एक्स्प्रेस मुलावरून गेली, पण मुलगा सुरक्षित राहिला”.
अपघातात संबंधित प्रवाशाच्या शरीराचे दोन तुकडे झाले अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम शार्दुल यांनी दिली आहे.
“आत्महत्या करणारा प्रवासी उल्हासनगरमधील रहिवासी आहे. बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या आत्महत्येमागील निश्चित कारण कळू शकले नाही,” असे पोलिसांनी सांगितले.