रत्नागिरी: लांजा तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची आवारातच तपासणी करुन त्याचा मृतदेह दोन तास आरोग्य केंद्राच्या आवारात झाकुन ठेवल्याचा प्रकार पुढे आला आहे. आरोग्य केंद्राच्या या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

लांजा तालुक्यातील साटवली येथील विजय केरू भोवड (वय ४०) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जवळ असलेल्या साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, भोवड यांना रुग्णालयातील बेडवर न तपासता रुग्णालयाच्या आवारातच येथील वैद्यकीय अधिका-यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर भोवड यांचा मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील जमिनीवर २ तास झाकून ठेवला.

तसेच साटवली प्रा. आ. केंद्राकडे स्वतःची रुग्णवाहिका असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेमधून भोवड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा येथे पाठविण्यात आला.

मात्र आरोग्य केंद्राच्या या प्रकारामुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या निष्कळजीपणा व गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. या घटनेबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करुन संबंधित आरोग्य अधिका-याला योग्य ती समज देण्यात आली असल्याचे सांगितले आहे.