सोलापूर : माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या उभारणीचे काम सुरू असताना तेथे एका रात्रीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अर्धपुतळा बेकायदेशीररीत्या उभारण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुतळ्याशी संबंधित आठजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र जागेवर अतिक्रमण करून उभारलेला पुतळा हलविणे प्रशासनाला दुस-या दिवशीही शक्य झाले नाही.
नातेपुतेजवळ कारूडे (ता. माळशिरस) येथे हा प्रकार उजेडात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील संबंधित कर्मचारी गगन सत्यवान गिरीगोसावी यांच्या फिर्यादीनुसार नातेपुते पोलीस ठाण्यात आठजणांविरूध्द गर्दी व मारामारी, बेकायदा जमाव आणि महाराष्ट्र पुतळ्यांच्या पावित्र्यभंगास प्रतिबंध अधिनियम (२०११) कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. हणमंत पाटील (वय ३२), सूर्यकांत पाटील (वय ३५), महेश थिटे (वय ३०), तुषार पाटील (वय ३२), सुनील पाटील (वय ३०), विजय रूपनवर (वय ३५), अमोल पाटील (वय ३५) आणि रणजित सूळ (वय ४५, सर्व रा. कारूंड) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>>“मराठा आणि ओबीसी समाजांत भेदभाव…”, भुजबळांचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “तुमचा गृहविभाग…”
सोलापूर जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षात अनधिकृतपणे सार्वजनिक रस्त्यांवर महापुरूषांचे पुतळे उभारण्याचे प्रकार घडत आहेत. माळशिरस तालुक्यात असे प्रकार सर्वाधिक आहेत. पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आदी तालुक्यांमध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे करून पुतळे उभारण्याचे आणि त्यातून स्थानिक राजकारण साधण्याचे प्रयत्न होत आहेत. यापैकी कारूंडे येथील घटनेची नातेपुते पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे.