जवळपास महिनाभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने मंगळवारी सायंकाळी शहराला चांगलेच झोडपून काढले. अवघ्या तासभरात रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहू लागले. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. अनेक भागात खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशीरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. शहर परिसरातील पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.
गणपतीच्या आगमनापासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. दुपारपासून ढगाळ वातावरण होते. पावसाचा शिडकावा होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास तो कोसळू लागला. अवघ्या काही मिनिटात रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. खरेदीसाठी अन् देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. जोरदार पावसामुळे अनेक मंडपांमध्ये पाणी गळत होते. ही गळती थांबविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली. त्यातच, अनेक भागात वीज गायब झाली. तासाभराच्या पावसाने मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्याने पायी चालणेही जिकीरीचे ठरले. साधारणत: तीन ते चार आठवडय़ांपासून शहर व परिसरातून गायब झालेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. मात्र, त्याचा धसका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. ग्रामीण भागात येवला व सटाणा तालुक्यात पावसाचे स्वरूप रिमझिम होते. निफाड व पिंपळगाव बसवंत पट्टय़ात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A strong return of rain in nashik
First published on: 11-09-2013 at 01:07 IST