केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना जाणूनबुजून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने केला जात आहे. नुकतीच ईडीनं नवाब मलिक यांना अटक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या एका ट्वीटमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अंधेरीत प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या एका कारवाईच्या संदर्भात अतुल भातखळकर यांनी हे ट्वीट केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील त्यासंदर्भात एक ट्वीट करत संबंधित व्यक्तींवर निशाणा साधला आहे.

भातखळकर म्हणतात, “कुणावर तरी…”

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये सूचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे?” असा खोचक प्रश्न अतुल भातखळकरांनी उपस्थित केला आहे.

तासाभरात नितेश राणेंचं ‘ते’ ट्वीट!

दरम्यान, अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर तासाभरात भाजपा आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. “राहुल कनाल…संजय कदम.. दोघांना आता प्राप्तीकर विभागाच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. नाईटलाईफ गँगच्या सदस्यांना आता रात्रीची झोप लागणार नाही. ये रात की सुबह नही!” असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे.

बजरंग खरमाटे कोण?

२०२१मध्ये आरटीओचे अधिकारी असणारे बजरंग खमाटे यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची ८ तास चौकशी केली होती. खरमाटे याआधी अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये दोन वेळा निलंबित झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्राप्तीकर विभागाच्या कारवाईसंदर्भात या दोन्ही ट्वीटमुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा सामना रंगण्याची शक्यता आहे.